कराड प्रतिनिधी । पाटण तालुक्यातील तारळे येथील एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणी तेथीलच दोन सख्ख्या भावांवर विनयभंग व अत्याचार हा गुन्हा नोंद झाला आहे. त्यातील एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असला तरी दुसरा मात्र मोकाट फिरत आहे. पोलीस कोणाच्यातरी दबावापोटी त्या संशयिताला अटक करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया शिंदे यांनी केला. संशयिताला तातडीने अटक न केल्यास आम्ही आमच्या स्टाईलने आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या छाया शिंदे यांनी कराड येथे आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाप्रमुख हर्षद कदम, उपजिल्हाप्रमुख रवींद्र पाटील, पाटण तालुका प्रमुख सुरेश पाटील ,शशिराज करपे आदींची उपस्थिती होती.
तारळे अत्याचार प्रकरणातील मोकाट आरोपीला तातडीने अटक करा : शिवसेना उपनेत्या छाया शिंदे pic.twitter.com/haMll1Ea6H
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) November 10, 2023
यावेळी शिंदे म्हणाल्या, मी आज संबंधित पिढीतेची भेट घेतली. वस्तूस्थिती जाणून घेतली. या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो. खरंतर पीडित महिलेची तक्रारच अनेक दिवस घेतली जात नव्हती. ती तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात होती. मात्र पुन्हा जास्त तगादा लागल्याने ती घेतली गेली आहे. दोन सख्ख्या भावावर गुन्हा आहे. मात्र दोघांच्या वर वेगळी कलमे लावण्यात आली आहेत.
छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली या पुण्यभूमीत अशा गोष्टी चुकीच्या आहेत. सध्या राज्याचे मुख्यमंत्री याच जिल्ह्यातील आहेत तर पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात ही घटना घडली आहे आणि त्यांचे खंदे समर्थक यात संशयित आरोपी आहेत. पण माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की, असल्या आरोपींना तुम्ही मदत करु नका. पोलिसांनी संशयित आरोपीला ताबडतोब ताब्यात घेतले नाही तर आम्ही आमच्या स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
आम्ही पण राजकारणात जशास तसे उत्तर द्यायला तयार : हर्षद कदम
पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा याचे उत्तम उदाहरण मी मल्हापेठ ग्रामपंचायत निवडणुकीत नुकतेच बघितले आहे. मी माझा पराभव मान्य करतो. पण हे जास्त दिवस चालणार नाही. आम्ही पण राजकारणात जशास तसे उत्तर द्यायला तयार आहोत, असे मत हर्षद कदम यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
जिल्ह्यात पालकमंत्र्यांची हिटलशाही आहे का?
कराड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी उपनेत्या छाया शिंदे आणि जिल्हा प्रमुख हर्षद कदम यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. या संदर्भात बोलताना त्यांनी सांगीतले कि, आम्हाला कराड येथील शासकीय विश्रामगृह येथे परवानगी घेतल्याशिवाय पत्रकार परिषद घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले. त्या संदर्भात तेथे एक फलक लावण्यात आला असून तसेजिल्हाधिकाऱ्यांचे लेखी आदेश असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हि बाब आम्ही समजून घेऊ शकतो. मात्र, एका हॉटेलचा कॉन्फरन्स हॉल बुकिंग करण्यासाठी संबंधित हॉटेल व्यवस्थापनाशी आम्ही संपर्क केला असता त्यांनीही पोलीस परवानगी शिवाय आम्ही तुम्हाला पत्रकार परिषद घेण्यासाठी हॉल देऊ शकत नाही, असे हॉटेल व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. या प्रकारावरून संतापलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केवळ सातारा जिल्ह्यातच पालकमंत्र्यांची हिटलशाही चालली आहे का? असा संतप्त सवाल देखील यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.