सातारा प्रतिनिधी | सातारा गुन्हे शाखेच्या पथकाने शिरवळ येथील शिंदेवाडीनजीक असलेल्या एका कंपनीच्या मैदानावर देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री करणाऱ्या एकास रंगेहात पकडले, तर त्याचा साथीदार पळून गेला. या कारवाईत गुन्हे शाखेच्या पथकाने देशी बनावटीचे ४ पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे असा २ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे (वय २४, रा. महर्षीनगर, स्वारगेट, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव असून, दिग्विजय ऊर्फ सनी देसाई (रा. सिंहगड कॅम्पस, पुणे) हा पळून गेला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शुभम ऊर्फ सोनू अनिल शिंदे व त्याचा साथीदार दिग्विजय ऊर्फ सनी देसाई हे शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील सातारा- पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर एका कंपनीच्या कंपाउंडजवळ देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसे विक्री करण्याकरिता येणार असल्याची माहिती सातारा गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.
त्यानुसार शिंदेवाडी गावच्या हद्दीतील महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर कंपनीच्या कंपाउंडजवळ सापळा रचण्यात आला. पथकामधील पोलिस कर्मचारी संशयितास पकडण्यासाठी दबा धरून बसले. दरम्यान, दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी दोन व्यक्ती दुचाकीवरून पुणे बाजूकडून एका कंपनीच्या बाजूकडे येताना दिसले. त्या वेळी त्यांना थांबण्याचा इशारा पोलिसांनी केला. मात्र, दुचाकी चालकाने गाडी थांबविली नाही. पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी खाली ओढले. मात्र, चालक पळून गेला. या वेळी दुचाकीवरून खाली ओढलेला व्यक्ती पळून जात असताना त्यास पोलिसांनी रंगेहात पकडले. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत काळ्या रंगाच्या बॅगेत देशी बनावटीची ४ पिस्तूल व ४ जिवंत काडतुसे पोलिसांना मिळून आली. पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, हवालदार लक्ष्मण जगधने, अरुण पाटील, शिवाजी भिसे, सचिन ससाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.