सातारा प्रतिनिधी । खंडाळा तालुक्यातील शिरवळ परिसरातील पळशी येथील वराह (डुकरं) चोरी प्रकरणाचा पर्दाफाश करत शिरवळ पोलिसांनी एका मोठ्या गुन्हेगारी टोळीला अटक केली. या कारवाईत एकूण ८ आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्या ताब्यातून तीन पिकअप व्हॅनसह सुमारे १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडाळा तालुक्यातील पळशी गावातील म्हारकी शिवारात ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १ ते पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेडमधील लहान-मोठे असे एकूण १८३ वराह चोरून नेले. विशेष म्हणजे, हे वराह तीन पिकअप व्हॅनच्या साहाय्याने चोरून नेण्यात आले. चोरीच्या वेळी शेडमध्ये वराहांची राखण करणाऱ्या साक्षीदारांवर चोरट्यांनी मारहाण व दमदाटी करून त्यांना गप्प बसवले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय माने (रा. शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा) यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे फिरवण्यात आली. प्राथमिक तपासात प्रकाश अशोक जाधव, मयूर अशोक जाधव, सोन्या उर्फ विकास संजय पवार आणि सचिन उर्फ बाळा तुकाराम जाधव या चार आरोपींना ७ जानेवारी २०२५ रोजी अटक करण्यात आली. आरोपींना उद्या २६ मार्च २०२५ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा सखोल तपास सुरू ठेवला. यामध्ये अजून ७ ते ८ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलीस पथकाने पुणे जिल्ह्यात गुप्त माहितीदारांच्या मदतीने कसून तपास केला. यानंतर आरोपींनी वापरलेल्या पिकअप गाड्यांच्या चालकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांना यश आले. परिणामी, १९ व २१ मार्च २०२५ रोजी सुनिल वसंत जाधव, पांडुरंग शिवाजी शिंदे, किरणपानसिंग शितलसिंग दुधाणी आणि ओमकार संतोष जाधव यांना अटक करण्यात आली.
या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या तीन पिकअप व्हॅन जप्त करण्यात आल्या असून, त्यांची किंमत सुमारे १७ लाख रुपये इतकी आहे. तपासादरम्यान हेही स्पष्ट झाले की, आरोपींनी चोरी केलेले वराह इतरत्र विक्रीसाठी नेले होते. या विक्रीचे अधिक तपशील मिळवण्यासाठी तपास सुरू आहे. अटक आरोपींपैकी काहींवर याआधी गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. विशेषतः एका आरोपीविरोधात पुण्यातील खडक पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल आहे. त्यामुळे ही टोळी केवळ वराह चोरीपुरती मर्यादित नसून, अन्य गंभीर गुन्ह्यांतही त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही कारवाई सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे, सहायक पोलीस निरीक्षक महादेव सिद, सहाय्यक फौजदार शशिकांत भगत, पोलीस कॉन्स्टेबल अरविंद बाऱ्हाळे आणि मिलींद बोराटे यांनी या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावली. पुढील तपास पोलीस करत आहेत.