सातारा प्रतिनिधी | मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवरून वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अमरावतीचे आमदार रवी राणा आणि कोरेगावच्या आमदार महेश शिंदे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी निशाणा साधला आहे. कोरेगावचे आमदार आणि अमरावतीचे आमदार रवी राणा यांना सत्तेची गुर्मी आणि मस्ती आली आहे. लाडकी बहीण योजना ही त्यांची जहागिरी असल्यासारखे वागत आहेत. मतदान करा अन्यथा डिसेंबरमध्ये तुमचा कार्यक्रम करू, अशा धमक्या देत आहेत. खोट्या केसेस दाखल करत आहेत; पण त्यांच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. शासकीय योजनांच्या माध्यमातून सामान्यांच्या पैशावर दरोडा टाकत असल्याची टीका आ. शशिकांत शिंदे यांनी केली.
राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, ”सर्वोच्च न्यायालयाने योजना राबवण्यासाठी योग्य नियोजन न केल्यास दुर्दैवाने त्या बंद कराव्या लागतील.
गेल्या काही दिवसांपासून लाडकी बहीण योजना चर्चेत आली. त्या योजनेमध्ये महायुतीत श्रेयवाद रंगला असून, त्यांच्यात एक वाक्यात नाही. ही योजना कोरेगावचे आमदार आणि अमरावतीचे आमदार रवी राणा हे आपली जहागिरी समजत आहेत. विरोधकांना दम देऊन मतदानाच्या अनुषंगाने दमबाजी करू लागले आहेत. योजनांच्या माध्यमातून पक्षीय राजकारण केले जात आहे.”