सातारा जिल्हा जिंकण्याचा BJP मध्ये दम नाही; शशिकांत शिंदेंचा निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । आमचा सातारा जिल्हा हा स्वाभिमानी आहे आणि सर्वात महत्वाचे तो राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे. त्याला डिवचण्याचा प्रयत्न कुणीही करू नये. सातारा जिल्हा जिंकण्याचा दम भाजपमध्ये नाही, असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी भाजपवर केला.

उंब्रज ता. कराड येथे राष्ट्रवादीच्या बूथ कमिटीचा नुकताच मेळावा पार पडला. या मेळाव्यात माजी मंत्री आ. बाळासाहेब पाटील, आ. अरुण लाड, राष्ट्रवादी आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, शहाजीराव क्षीरसागर, सौ.संगीता साळुंखे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आ. शिंदे यांनी मेळाव्यात माण खटाव मतदार संघात भाजपच्या दिग्गजांनी केलेल्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी आ. शिंदे म्हणाले की, हिम्मत असेल तर भाजपने भाजपचा कार्यकर्ता असलेली व्यक्ती निवडणुकीसाठी उभी करावी. तसेच विदर्भ व मराठवाड्याचा अनुषेश भरून काढावा असे आवाहन केले. तसेच बूथ कमिटी कागदावर कार्यरत न राहता प्रत्यक्ष कार्यरत असण्यासाठी बूथ कमिटीची योग्य बांधणी करावी.

यावेळी आ. पाटील म्हणाले, कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन करण्यासाठी पक्षाच्या आदेशाची वाट न पाहता रस्त्यावर उतरले पाहिजे. तसेच बूथ कमेटी स्थापन करताना कार्यकर्त्यांनी मतभेद बाजूला ठेवून काम करणे गरजेचे आहे.

यावेळी सारंग पाटील, आ. अरुण लाड, देवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास कराड उत्तर मधील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य, कारखान्याचे संचालक व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक देवराज पाटील यांनी केले. आभार माजी पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. प्रमोद पुजारी यांनी मानले.