पाटण प्रतिनिधी | पाटण विधानसभा मतदार संघ म्हंटल की तो शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते आमदार तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांचा मतदार संघ म्हणून ओळखला जातो. त्यांना या मतदारसंघात कुणीच लोणत्याही निवडणुकीत पराभूत करू शकत नाही, असा मंत्री देसाई यांचा विश्वास असल्याचे बोलून दाखवले जाते. मात्र, त्यांच्या एका गटाचा एका निवडणुकीत पराभव झाला आहे. आणि तो त्यांच्या विरोधी गट राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून होय. पाटण विधानसभा मतदार संघात नुकतीच एक निवडणूक पार पडली. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाचा खा. शरद पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या गटाने पराभव केला.
पाटण तालुक्यात एका पाणी पुरवठा संस्थेची नुकतीच निवडणुक पार पडली. या निवडणुकीत चार उमेदवारांना समान मते मिळाल्यानंतर चिठ्ठीने निर्णय घेण्यात आला. यात शिवसेना शिंदे गटाला पाटणकर गटाने जोरदार धक्का दिला. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदार संघातील निसरे येथील श्री सोमाईदेवी सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या पंचवार्षिक संचालक मंडळाच्या निवडणूक अटीतटीची झाली.
पारंपारिक राजकीय विरोधक देसाई आणि पाटणकर (शरद पवार गट) यांच्यात लढत झाली. निसरे तालुका पाटण येथे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या श्री सोमाईदेवी शेतकरी विकास पॅनेलचा 7 विरुद्ध 6 ने विजय झाला. या निकालाने पाटणकर गटाची सत्ता अबाधित राहिली असून देसाई गटाचा मात्र, पराभवाला सामोरे जावे लागले.
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद गुरव यांनी काम पाहिले. श्री सोमाई देवी सहकारी पाणीपुरवठा संस्थेसाठी 327 इतके मतदान झाले होते. यामध्ये 13 मतपत्रिका बाद झाल्या. या संस्थेचे कार्यक्षेत्र निसरे, आबदारवाडी, गिरेवाडी असे असून, 350 एकर क्षेत्र असलेल्या गावांमध्ये एकूण 565 सभासद आहेत. या झालेल्या निवडणुकीत प्रथमच अटीतटीची लढत पाहावयास मिळाली. मात्र, या निवडणुकीत देसाई गटाचा एका चिठ्ठीमुळे पराभव झाला आहे.