उमेदवारीसाठी गळ घातलेल्या जिल्ह्यातील ‘त्या’ 32 इच्छुकांचा शरद पवार घेणार उद्याच निर्णय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या आचार संहितेची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशात महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांकडून जागा वाटपाची चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे. या दरम्यान संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघापैकी त्यांच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात खासदार शरद पवार कोणा कोणाला उमेदवारी देणार हे पहावं लागणार आहे.

सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील ३२ इच्छुक उमेदवारांनी मंगळवार दि. ८ रोजी पुणे येथे जाऊन मुलाखती दिल्या आहेत. त्यांचा फैसला शरद पवार कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे.

सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामार्फत विधानसभा निवडणुकीकरिता ३२ इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागविले होते. त्यानुसार फलटणमधून राजेंद्र पाटोळे, अभय वाघमारे, लक्ष्मण बापूराव माने, अमोल आवळे, दिगंबर आगवणे, वैभव पवार, रमेश आढाव, बुवासाहेब हुंबरे, राजेंद्र काकडे, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, अनिल जगताप, घनश्याम सरगर, बापूसाहेब जगताप, नंदकुमार मोरे, सूर्यकांत शिंदे, आशिष सरगर, वाईतून दत्तात्रय ढमाळ, अनिल बुवासाहेब जगताप, डॉ. नितीन सावंत, रमेश धायगुडे पाटील, कैलास जमदाडे, यशराज मोहन भाेसले, नीलेश डेरे आणि माण-खटावमधून सूर्यकांत राऊत, नितीन देशमुख, प्रभाकर देशमुख, प्रभाकर घार्गे, अभयसिंह जगताप, अनिल देसाई, सातारा-जावलीसाठी सातारा-जावली मतदारसंघातून शफिक कासम शेख, दीपक पवार, अमित कदम, तर कोरेगावातून आमदार शशिकांत शिंदे यांनी मुलाखती दिल्या.

तर जिल्ह्यातील महत्वाचा मतदार संघ असलेल्या कराड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील आणि कराड दक्षिणसाठी सविनय कांबळे आणि पाटणसाठी सत्यजित पाटणकर अशा ३६ जणांनी शरद पवार यांच्यापुढे मुलाखती दिल्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादीचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते.

शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष..

इच्छुकांनी आपल्या मतदार संघाची बारीक-सारीक अद्ययावत माहिती घेऊन ठेवली होती. या मुलाखती पार पडल्यानंतर आता यावर पक्ष आणि पक्षाचे नेते शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता उमेदवारांना लागली आहे.

तर उद्याच पवार उमेदवारांची घोषणा करतील

खासदार शरद पवार यांच्या उपस्थिती उद्या फलटण येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचा कार्यक्रम होणार आहे. साडे तीन वाजता होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि संपूर्ण राजे गट उपमुख्यमंत्री अजितदादांची साथ सोडत खासदार शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करीत तुतारी हाती घेतली. यावेळी खासदार शरद पवार कदाचित सातारा जिल्ह्यातील त्यांच्या पक्षातील उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे.

रामराजेंच्या प्रवेश न करण्यामागचे असेही एक कारण…

उद्या फलटण येथील प्रवेश कार्यक्रमात रामराजे नाईक निंबाळकर शरद पवार असताना व्यासपिठावर हजेरी लावणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. मात्र, रामराजे हे सध्या विधानपरिषदेचे आमदार असून आणखी काही वर्षांचा कार्यकाळ बाकी आहे. त्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे रामराजे हे दि. १४ रोजी प्रवेश करणार नाहीत. यापेक्षा वेगळे कारणसुद्धा रामराजे यांच्या मनात असू शकते.