कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार शरद पवार कराड मुक्कामी आले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना विधानसभा निवडणुकीतील पराभवाची काही कारणं सांगितली. “महायुती पुन्हा सत्तेत आली नाही तर ‘लाडकी बहीण योजना’ बंद होईल, या प्रचाराचा महायुतीला फायदा आणि महाविकास आघाडीला फटका बसल्याचं निरीक्षण खासदार शरद पवार यांनी नोंदवलं. योगी आदित्यनाथांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’, या घोषणेमुळं मतांचं ध्रुवीकरण झालं. आमचा पराभव झाला असला तरी लोकांमध्ये जाऊन पुन्हा नव्याने उभे राहू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
कराड येथील पत्रकार परिषदेत खा. शरद पवार पुढे म्हणाले की, “काल निकाल लागला आज मी कराडमध्ये आहे. हा निकाल लागल्यावर एखादा घरी बसला असता. पण मी घरी बसणार नाही. आमच्या तरुण पिढीला हा निकाल लागेल असं वाटलं नव्हतं. त्यांचा आत्मविश्वास वाढला पाहिजे. त्यांना पुन्हा उभं करणं, त्यांचा आत्मविश्वास वाढवणं, नव्या जोमाने कर्तृत्वान पिढी उभं करणं हा माझा कार्यक्रम राहील. “राज्यात जो विधानसभेचा निकाल लागला आहे तो आम्हाला अपेक्षित नाही. आम्हाला अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही. तरी लोकांनी दिलेला निर्णय आणि निकालाचा मी अभ्यास करणार आहे. लोकांना अपेक्षित होता तसा निकाल लागलेला नाही.
“आमची जी अपेक्षा होती तसा निर्णय नाही. शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, त्यामुळे मी माझ्याकडे काही अधिकृत काही माहिती नाही तोपर्यंत आतापर्यंतची जी व्यवस्था आहे, त्यावर भाष्य करत नाही. निर्णय लोकांनी दिला. अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात आहे. असा निर्णय कधी आला नव्हता. आता आला तर त्याचा अभ्यास करणं, त्याची कारणं शोधणं, नक्की काय आहे समजून घेणं आणि पुन्हा एकदा नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभं राहणं.
मी काय करावं हे मी आणि माझे सहकारी ठरवतील. मुद्दा तो नाही. “जी माहिती आम्ही लोकांकडून कार्यकर्त्यांकडून घेत आहे, लाडक्या बहिणीचा मुद्दा लोकांकडून ऐकायला मिळतो. हे एक महत्त्वाचं कारण आहे. प्रत्यक्ष महिलांच्या खिशात काही रक्कम देण्यात आली. त्याचा प्रचार हाही करण्यात आला, दोन अडीच महिन्याची रक्कम आता देत आहोत. त्यांनी सांगितलं की, आम्ही सत्तेत नसलो तर ते बंद होतो. हे बंद होईल याची चिंता महिलांना झाली. त्यामुळे या महिलाांनी आमच्या विरोधात मतदान केलं हे प्राथमिक दिसतं”, असं शरद पवार म्हणाले.
सर्वांनी कष्ट केले पण निकाल आमच्या विरोधात गेला
“दोन एक टक्क्यांनी महिलांचं मतदान वाढलं हे आताच्या आकडेवारी दिसून येतं. लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली. त्यात थोडसं आम्हाला लोकांचा अधिक विश्वास होता. त्या अधिक विश्वासामुळे जेवढं आक्रमक रितीने या कँपेन करण्याचा प्रयत्न केला. त्यापेक्षा अधिक आक्रमक प्रचार करण्याची गरज होती. मी राज्यात सर्व जिल्ह्यात फिरलो. तिथे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंचाही उमेदवार होता. आमचा उमेदवार होता तिथे इतर पक्षाचे कार्यकर्ते राबत होते. सर्वांनी कष्ट केले. पण निकाल आमच्या विरोधात गेला, असल्याचे पवार यांनी यावेळी म्हटले.
अजित पवार – युगेंद्र पवार तुलना होऊ शकत नाही
“अजित पवार यांना जास्त जागा आल्या हे मान्य करणं गैर नाही. मी बारामतीत उमेदवार दिला नसता तर वेगळा मेसेज बाहेर गेला असता. तसंच नवखा उमेदवार आणि अनुभवी उमेदवार लढत याबाबत आम्हाला कल्पना होती. त्यामुळं अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होवू शकत नाही,” असं म्हणत शरद पवार यांनी युगेंद्र पवार यांचा झालेला पराभव मान्य केला.
विरोधी पक्षनेता असलेली फिगर विरोधी पक्षाकडे नाही...
“विरोधी पक्षनेता असलेली फिगर विरोधी पक्षाकडे नाही. पण विरोधी पक्षनेता असावा. १९८० मध्ये आमचे ५२ आमदार गेले. तेव्हा विरोधी पक्षनेता नव्हता. आम्ही ६ आमदार होतो. पण आम्ही प्रभावी काम केलं आणि निवडणूक जिंकली. राज्याला विरोधी पक्ष नव्हता ही पहिलीच वेळ नाही. १९८० मध्ये देखील तशी परिस्थिती झाली होती. दोन-तीन वेळा झाली होती. नंतर त्यावेळी दोन-तीन पक्ष एकत्र येऊन विरोधी पक्षनेता बनवू शकत होते. एकदा मी होतो, एकदा निहाल अहमद आणि मृणालताई गोरेही विरोधी पक्षनेते होते”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं
“ईव्हीएमबाबत मी काही सहकाऱ्यांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे नाही. तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही. यापूर्वी कधी झालं नव्हतं असं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात”, असे देखील शरद पवार यांनी म्हंटले आहे.
अजून जोमानं काम करणार
“आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही. हा लोकांनी दिलेला निर्णय असून आम्हाला तो मान्य आहे. लोकसभेच्या निकालानंतर आम्हाला जास्त विश्वास होता. आता परत जोमानं कामाला लागणार आहोत. तळागाळात जाऊन अजून चांगलं काम करणार आहोत. अधिकृत आकडेवारी आल्यावर त्याचा अभ्यास आणि विश्लेषण करणार आहोत,” असं शरद पवार म्हणाले.