कराड प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. त्यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे उद्या सातारा व कराड दौऱ्यावर येत आहेत. उद्या ठीक 10 वाजता कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी ते अभिवादन करणार असल्याची माहिती माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
कराड येथील पत्रकार परिषदेत बोलताना बाळासाहेब पाटील म्हणाले, रयत शिक्षण संस्थेची वार्षिक सभा उद्या सकाळी ११ वाजता सातारा येथे संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने शरद पवार साहेब उद्या सकाळी १० वाजता कराडला येणार असून यावेळी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी दर्शन घेणार आहेत. नंतर ते साताऱ्याला जाणार आहेत अशी माहिती बाळासाहेब पाटील यांनी दिली.
दरम्यान, अजित पवार यांच्यासह जवळपास ३६ आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी केली असली तरी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, बाळासाहेब पाटील हे शरद पवार यांच्या सोबतच आहेत. तर साताऱ्यातील वाई मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील हे मात्र अजित पवार यांच्या गोटात गेले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर सुद्धा दावा केला असून आगामी काळात सर्व निवडणुका घडयाळ चिन्हावर लढवणार असल्याचे म्हंटल आहे. त्यामुळे आगामी काळात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना महाराष्ट्रात पाहायला मिळू शकतो.