सातारा प्रतिनिधी | महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील सातारा जिल्ह्यातील माजी आमदार, पदाधिकारी यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात खासदार शरद पवार यांनी बैठक घेतली. यावेळी पराभवाने खचून न जाता पुन्हा नव्या दमाने उभे राहात आपापल्या मतदारसंघात सक्रिय व्हावे, सक्षम विरोधक म्हणून जिल्ह्यात व राज्यात भूमिका पार पाडताना जिल्ह्यात पक्ष संघटना मजबूत करून नव्या दमाने वाटचाल करा, जिल्ह्यात पक्षाची ताकद कमी होणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचना खा. शरद पवार यांनी माजी आमदारांना केल्या.
सकाळी अकरा वाजता पार पडलेल्या बैठकीस माजी आमदार बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, दीपक चव्हाण, प्रभाकर घार्गे, अरुणादेवी पिसाळ, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सरचिटणीस राजकुमार पाटील तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत खा. शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व उमेदवारांकडून पराभवाची नेमकी कारणे जाणून घेतली, तसेच नेमके काय चुकले, कुठे आपण कमी पडलो? याचा आढावा घेतला. यापुढेही सातारा जिल्ह्यात सक्षम विरोधी पक्ष म्हणून आपण उभे राहू, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पुन्हा संघटनात्मक बांधणी नव्याने करूया, असा विश्वास खा. पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.
यावेळी सर्व उमेदवारांनी विधानसभेच्या निवडणुकीचा निकालावर भाष्य करताना ही ईव्हीएमचा घोटाळा करूनच महायुतीचे आमदार सत्तेत आल्याचा मुद्दा खासदार श्री. पवार यांच्यापुढे मांडला. यावर श्री. पवार यांनी याबाबत ठोस पुरावा माझ्याकडे नाही. त्यामुळे आपण काही पुरावे मिळतात का, ते पाहू. मिळाल्यास आपण एकत्रितपणे याविरोधात आंदोलन करू, असे सांगितले.