कराड प्रतिनिधी | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाशी माझा तीळ मात्र संबंध नाही. माझा कोणताही संबंध आढळल्यास आपण राजकारण सोडू, असा खुलासा उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे. सुषमा अंधारेंनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य चोवीस तासात मागे घ्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशाराही देसाईंनी दिला आहे.
ललित पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली होती. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली. यासंदर्भात शंभूराज देसाई आक्रमक झाले. समाजात आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी सुषमा अंधारे यांनी बेजबाबदार वक्तव्य केले आहे. वकिलांच्या सल्ल्यानुसार आपण त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा शंभूराज देसाईंनी दिला आहे.
अंधारेंचे वक्तव्य हास्यास्पद
शंभूराज देसाई म्हणाले की, सुषमा अंधारे यांनी ललित पाटील प्रकरणी केलेले वक्तव्य हास्यास्पद आहे. माझा त्या प्रकरणाशी काडीमात्र संबंध नाही. अंधारे या बेजबाबदार वक्तव्य करून समाजात माझी प्रतिमा खराब करत आहेत. कायदेशीर सल्लागाराशी चर्चा करून अंधारेंवर कायदेशीर कारवाई करणार आहे.
अंधारेंच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ
सुषमा अंधारे यांनी सकाळी पुण्यात माध्यमांशी बोलताना ललित पाटील प्रकरणात दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची नार्कोटेस्ट करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. माध्यमांच्या प्रतिनिधींनी तातडीने उत्पादन शुल्क मंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. यावेळी देसाईंनी अंधारेंवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला.