आरल निवकणेच्या पुनर्वसनासाठी उपलब्ध जमीन दाखवणे सुरु करा – पालकमंत्री देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील आरल निवकणे प्रकल्पग्रस्तांची कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी असून या निवकणे गावच्या ४२ पात्र प्रकल्पग्रस्तांसाठी पाटण तालुक्यातच नजीकच्या गावांमध्ये जागेचा शोध घेऊन प्राधान्याने जागा उपलब्ध करुन द्यावी. अन्य प्रकल्पांमधील शिल्लक जमीन दाखवण्याचा कार्यक्रम पुढील चार दिवसांमध्ये लावावा त्यासाठी तहसीलदार दर्जाचा अधिकारी नियुक्त करावा, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात आज विविध विषयांवर पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न झाली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, एमएमआरडीएचे मुख्य अभियंता श्री. चामलवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्री. गव्हाड, पाटणचे प्रांताधिकारी सोपान टोंपे, तहसीलदार अनंत गुरव आदी उपस्थित होते.

या प्रकल्पांतर्गत एकूण 301 खातेदार असून पुनर्वसन पर्यायी जमिन देय खातेदार 157 इतके आहेत. त्यापैकी निवकणे गावच्या ४२ खातेदारांना पुनर्वसनाची कार्यवाही तात्काळ सुरु करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

पाटण तालुक्यात 2021 मध्ये अतिवृष्टी मुळे दरड कोसळून बाधित झालेल्या गावांच्या कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबत एमएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी गावांमधील अनुषांगिक कामे तात्काळ सुरु करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

भूस्खलनामुळे पाटण तालुक्यातील जितकर वाडी (जिंती), शिदृकवाडी, काहीर, आंबेघर (खा), आंबेघर (वरचे), ढोकावळे, मिरगाव, काटेवाडी (हुम्बरली), हुंबरळी या गावांचा समावेश आहे. या गावांमधील 499 कुटुंब संख्या आहे. कायम स्वरुपी पुनर्वसनाबाबत चर्चा करताना पालकमंत्री श्री. देसाई यांनी एमएमआरडीए व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी या अनुषंगाने तात्काळ कामे सुरु करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई यांनी मौजे मरळी ता. पाटण येथील जल जीवन मिशन कामाचाही आढावा घेतला. जल जीवन मिशन अंतर्गत अपूर्ण कामांच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध होणे आवश्यक असून त्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.