सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सातारा जिल्ह्यात 5 लाख 21 हजार 17 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून यापैकी 5 लाख 10 हजार 419 इतक्या अर्जांना मान्यता दिली आहे. याची टक्केवारी 98.42 असून या योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा येथे होणार आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पालकमंत्री देसाई यांनी नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, महिला व बाल विकास अधिकारी विजय तावरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार व गट विकास अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत दि. 18 ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करावे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिला लाभार्थी येतील यासाठी नियोजन करावे. महिलांसाठी वाहनांची व्यवस्था करावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
या बैठकीत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर 5 युवकांना नियुक्तीचे पत्र पालकमंत्री देसाई यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच वीर पत्नी साधना साळुंके, अतित ता. खंडाळा यांना शासनाकडून 2 हेक्टर जमिन वाटपाचे आदेशाचे प्रदान करण्यात आले.