कराड प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीची घोषणा होईल ना होईल. मात्र, इकडे इच्छुक अनाई नेते मंडळींनी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरु केली आहे. कुणी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या पूजेला जाऊन साकडं घालत आहे तर कुणी लाडक्या बहिणींना महालक्ष्मी दर्शन घडवू लागलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे नेते तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी नुकतीच महालक्ष्मी मंदिरात जाऊन पूजा केली आणि महालक्ष्मी देवीकडे साकडं देखील घाटल. त्यांच्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा सातारा जिल्हा समन्वयक इंद्रजीत गुजर कॅप्टन यांनी आज मंगळवारी नवरात्र उत्सवानिमित्त कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सुमारे 700 महिलांना मोफत कोल्हापूर महालक्ष्मी दर्शनाचा प्रवास घडवला. त्यामुळे निमित्त महालक्ष्मी दर्शनाचं आणि मोर्चे बांधणी विधानसभा निवडणुकीची अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुच्या आचारसंहितेची अवघ्या काही दिवसात घोषणा होणार आहे. या अगोदरच इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळींकडून आपल्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी अनेक प्रकारच्या क्लुप्त्या लढविल्या जात आहेत. मग कुणी कार्यकर्त्यांना जेवण तर कुणी निसर्गरम्य वातावरणातील प्रवास आणि कुणी महिला मंडळांना मोफत देवीदर्शन घडवत आहेत. अशा प्रकारच्या क्लुप्त्यांमधून इच्छुकांकडून महिलावर्ग तसेच पुरुष वर्गांना आपल्या बाजूने घेण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला जात आहे.
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक कॅप्टन इंद्रजीत गुजर यांनी नुकतेच काही दिवसापूर्वी “मिशन विधानसभा” असे बॅनर लावून एक प्रकारे निवडणूक लढविण्याचे संकेतच दिले आहेत. त्यानंतर त्यांनी आज नवरात्र उत्सवाचे निमित्त साधत महिलावर्गांना मोफत कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन देखील घडविले. यापूर्वीही त्यांनी कराड शहरात नगरपालिकेच्या नगरसेवक पदातून अनेक प्रकारची समाजोपयोगी कामे केलेली आहे.
दरम्यान, त्यांच्याकडून आज महिलावर्गांना घडविण्यात आलेला मोफत महालक्ष्मी दर्शन प्रवास हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतंच सहकुटुंब कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरात जाऊन महालक्ष्मीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी महालक्ष्मीचे दर्शन घेतल्यानंतर तिच्याकडे एक साकडं देखील घातलं. एन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर एकीकडे त्यांनी घातलेलं साकडं आणि दुसरीकडे इंद्रजीत गुजर यांनी 700 महिलांना मोफत घडवलेला प्रवास या दोन गोष्टींची चांगली चर्चा सुरू झाली आहे. आता पुढील काळात अजून कोण कोण इच्छुक उमेदवार आणि नेतेमंडळी काय काय नामी शकली लढवतील हे पहावे लागेल. मात्र यामध्ये सर्वसामान्य मतदार आणि कार्यकर्ते यांची मात्र चांगली चंगळ होत असताना देखील दिसू येत आहे.
पाटणमध्ये होणार चांगलीच फाईट
पाटण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशीच लढत होणार आहे. या ठिकाणी महायुतीकडून जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांची उमेदवारी फिक्स आहे तर महाविकास आघाडी करून अद्याप मात्र उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र शरदचंद्र पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. मागील निवडणुकीप्रमाणे याही वेळेस पाटणकर विरुद्ध देसाई अशी तगडी फाईट पाटण विधानसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
कराड दक्षिणेत दुरंगी होणार की तिरंगी?
कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी व काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री तथा आमदार पृथ्वीराज चव्हाण हे उमेदवार असणार आहेत तर त्यांच्या विरोधात भाजप महायुतीकडून डॉ. अतुल भोसले निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक कॅप्टन इंद्रजीत गुजर यांनी बॅनरबाजी करत आपणही कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात लढणार असल्याचे दाखवून दिल्याने या मतदारसंघात यावेळेस निवडणूक दुरंगी होणार का तिरंगी हे येणाऱ्या काळात पहावे लागणार आहे.
नेतेमंडळी म्हणे तयारीला लागा…
निवडणूक जवळ आल्याने आणि काही दिवसातच आचारसंहितेची घोषणा देखील होणार आहे. निवडणुकीची तयारी देखील इच्छुकांसह उमेदवारांनी महिनाभर अगोदरपासून सुरू केली आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेत त्यांच्या बैठका घेत त्यांना निवडणूक जवळ आली आहे बाबांनो आतापासूनच तयारीला लागा, अशा प्रकारचे आदेश दिले जात आहे.
लोकसभेच्या वेळेलाच काहींकडून विधानसभेची मोर्चेबांधणी
गत चार महिन्यापूर्वी लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये येणाऱ्या पुढील काळातील विधानसभा निवडणुकीची देखील मोर्चे बांधणी इच्छुकांनी त्याचवेळी केली आहे. खासदारकीसाठी इच्छुक उमेदवारांचा प्रचार करत असताना पुढील काळात विधानसभा निवडणूक सुद्धा जवळ आली आहे त्यामुळे “आम्हाला विसरू नका, काय हवं नको ते बिनधास्त मागा” असे सांगत कार्यकर्ते पदाधिकारी मतदारांना आपलंसं करण्याकडे अनेकांना यश आलेलं आहे.