महामार्गावरील खड्डे 15 ऑगस्टपर्यंत न बुजवल्यास गुन्हे दाखल करणार; पालकमंत्री देसाईंचा महामार्ग प्राधिकरणाला इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या संदर्भात पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. यावेळी सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.4 या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. या खड्डयामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवावेत. ते न बुजवल्यास गुन्हे दाखल केले जातील, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले.

साताऱ्यात पर पडलेल्या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाबरोबर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या रस्त्यांवरील खड्डेही बुजवावेत. कुठेही अपघात होणार नाही यासाठी रस्ता सुस्थितीत आणावा. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहतूक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत केल्या.

पाटण ते कोयनानगर रस्त्याचे काम 15 दिवसात सुरु करा

यावेळी पाटण ते कोयनानगर रस्त्यांच्या कामासंदर्भात देखील पालकमंत्री देसाई याणी बैठक घेतली. यावेळी पाटण ते कोयनानगर या 13 कि.मी रस्त्याचे काम प्रलंबीत आहे. या रस्त्यांवर अनेक खड्डे पडले आहेत. खड्डे बुजविण्याबरोबर रस्त्यांचे काम 15 दिवसात सुरु करावेत, पाटण ते कोयनानगर रस्त्यांवरील पडलेले खड्डे तात्काळ बुजवावेत, अशा सूचना करुन पालकमंत्री देसाई म्हणाले. हे खड्डे बुजविण्यासाठी जास्तीचा मनुष्यबळाचा वापर करावा. बुजविलेले खड्डे पाऊसामुळे पुन्हा उखडणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पाटण ते कोयनानगर 13 कि.मी कामासाठी 82 कोटी 82 लाख निधी मंजूर असून हे काम ऑल ग्रेस डेव्हलपर प्रा.लि. कंपनी करणार आहे. या कंपनीने रस्त्याच्या कामासाठी लागणारी यंत्रसामुग्री लवकरात लवकर आणावी. हे काम 15 दिवसात सुरु करावे. काम करीत असताना त्याचा दर्जाही चांगला ठेवावा, अशा सूचनाही देसाई यांनी बैठकीत केल्या.