पाटणला शंभूराज देसाई, सत्यजित पाटणकर अन् हर्षद कदम भरणार उद्या उमेदवारी अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । पाटण विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान अर्ज भरण्याच्या सुरुवातीपासून दिग्गज मंडळींपैकी एकानेही आपला उमेदवारी अर्ज भरलेला नाही. अर्ज भरण्यास दोन दिवस उरले असताना उद्या सोमवार दि. सोमवार, २८ रोजी महायुतीतर्फे शिवसेना शिंदे गटातून राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai), अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर (Satyajitsinh Patankar), महाविकांस आघाडीतून शिवसेना ठाकरे गटाचे हर्षद कदम (Harshad Kadam) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार व मंगळवार या दोनच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे या दोन दिवसात मान्यवर नेत्यांसह अन्य पक्ष, अपक्ष यांचे अर्ज दाखल होणार आहेत. यामध्ये काही उमेदवार मोठ्या शक्तिप्रदर्शनासह तर काही उमेदवार वैयक्तिक पातळीवर जाऊन आपापला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून पदयात्रा, रॅलीसाठी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, शुक्रवार दि. २५ रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवसापर्यंत पाटण विधानसभा मतदार संघात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. तर शनिवार व रविवारी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बंद होती. आता उद्या सोमवार दि. २८ व मंगळवार दि. २९ या दोन दिवसात सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. दरम्यान, पाटण विधानसभा मतदार संघात आतापर्यंत एकूण ५३ नामनिर्देशन अर्ज नेण्यात आले आहेत.

शेवटच्या यादीपर्यंत पाटणकरांनी पहिली उमेदवारीची वाट

महाविकास आघाडीतीळ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील नेते सत्यजित पाटणकर यांनी विधानसभा निवडणुकीत लढण्याची मोठी तयारी केली आहे. त्यांना आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा होती. म्हणून त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली. मात्र, आज शरदचंद्र पवार गटाची शेवटची यादी प्रसिद्ध झाली. या यादीत देखील सत्यजित पाटणकर यांच्या समावेश नसल्याने आता पाटणकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी उद्याच आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे सांगितले आहे.

Harshad Kadam 02

नावाची घोषणा होताच कदम पोहचले ठाकरेंच्या भेटीला

जिल्ह्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सातारा जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांना बुधवारी उमेदवारी जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच कदमांनी थेट मातोश्री गाठली. याठिकाणी जाऊन उद्धव ठाकरेंचा आशिर्वाद आणि AB फॉर्म घेऊन कदमांनी पाटणला आले. मात्र, पाटण विधानसभा मतदार संघातून उद्याच आपण उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे देखील कदम यांनी सांगितले आहे. कदमांच्या उमेदवारीमुळे माजी मंत्री तथा खासदार शरद पवार समर्थक विक्रमसिंह पाटणकर गटाला मोठा धक्का बसला आहे. हर्षद कदम यांनी सातत्याने पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवली असतानाच त्यांना उमेदवारी जाहीर झाल्याने ठाकरे गटामध्ये उत्साह पाहावयास मिळत आहे. मविआमध्ये उद्धव ठाकरेंनी शरद पवारांना ‘दे धक्का’ दिला आहे.

शंभूराज देसाई भरणार उद्या उमेदवारी अर्ज

२०१४ आणि २०१९ मध्ये सलग दोन वेळा शिवसेनेच्या शंभुराज देसाईंनी राष्ट्रवादीच्या सत्यजित पाटणकरांचा पराभव केला. यावेळेस तिसऱ्यांदा २०२४ मध्ये देसाई निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. उद्या शंभूराज देसाई देखील आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

तिरंगी लढत झाल्यास कुणाला फायदा?

जर शरदचंद्र पवार गटातून बाजूला होत अपक्ष म्हणून सत्यजितसिंह पाटणकर यांनी निवडणूक लढली आणि ते जिंकले तर ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीबरोबर राहतील यात शंका नाही. पाटण तालुक्यात कोणतीही निवडणूक असली कि त्यानिवडणुकीत देसाई आणि पाटणकर दोघांचेही कार्यकर्ते निवडणूक काळात आक्रमक होत असतात. या सगळ्यांचा विचार करता पाटण मतदारसंघ नक्कीच संवेदनशील आहे. मात्र, शरद पवार यांना २०१४ आणि २०१९ सालात हुलकावणी दिलेला हा मतदारसंघ पुन्हा ताब्यात घ्यायचा असेल तर तिरंगी लढत लढवणे फायद्याचे आहे. यामध्ये सत्यजितसिंह पाटणकर यांचे पुनर्वसन, शंभूराज देसाई यांचा पराभव, पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी पवार गटाचे प्राबल्य मजबूत करणे यासारखे तीन विषय सत्यजितसिंह पाटणकर यांच्या विजयाने शरद पवार साध्य करू शकतात. यात शंका नाही.