पाटण प्रतिनिधी | 2021 मध्ये पाटण तालुक्यात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे अनेक कुटुंबे बेघर झाली होती. दरडग्रस्तांसाठी सुरक्षित निवारा उभारणे ही शासनाची सर्वोच्च प्राथमिकता असून या कामासाठी संबंधित यंत्रणांना दर्जेदार आणि वेगवान काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकल्पाअंतर्गत मिरगाव, धोकावले, आंबेघर आदी 9 गावांचे पुनर्वसन शिद्रुकवाडी (धावडे), चाफेर, आंबेघर (खा), आंबेघर वरचे, देशमुखवाडी, काहीर या सहा ठिकाणी प्रस्तावित आहे. यासाठी सुमारे 550 नवीन घरांचे बांधकाम सुरू असून, या कामांना गती देण्यासाठी स्थानिक प्रशासन सज्ज झाले असल्याचे पालकमंत्री देसाई यांनी म्हटले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे स्वीय सहायक आणि तत्कालीन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी पुनर्वसन कामांची नुकतीच पाहणी केली. यावेळी पाटणचे तहसीलदार अनंत गुरव देखील उपस्थित होटे. यावेळी गाढे यांनी पाहणी केल्यानंतर कामाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त करत, लवकरात लवकर दरडग्रस्तांना नवीन आणि सुरक्षित निवारा देण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी पालकमंत्री देसाई यांनी म्हटले की, “दरडग्रस्तांना सुरक्षित निवारा देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. यासाठी दर्जेदार आणि वेळेत काम पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी सज्ज राहून कामाचा दर्जा आणि गती कायम ठेवावी.” या पुनर्वसन प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करत आहे. स्थानिक अधिकारी, अभियंते आणि संबंधित कर्मचारी यांना नियमित पाहणी करून कामाचा दर्जा आणि गती तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कामाच्या प्रगतीसंदर्भात सुनील गाढे यांनी म्हटले की, “पुनर्वसन प्रकल्पाचे काम सुरळीत सुरू आहे. घरांची गुणवत्ता टिकवण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. लवकरात लवकर घरांचे काम पूर्ण करून दरडग्रस्तांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.”