सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोरणा गुरेघर व वांग मराठवाडी प्रकल्पबाबींचा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा घेतला. यावेळी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना महत्वाच्या सूचना देखील केल्या.
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, पोलीस अधीक्षक समिर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले की, मोरणा गुरेघर प्रकल्पांतर्गत उजवा व डावा कालवा हा बंदिस्त पाईपलाईन करावयाचा आहे. या कामाच्या मंजुरीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक घेऊन विशेष बाब म्हणून या कामाला मंजूरी घेण्यात येईल. त्याचबरोबर वांग मराठवाडी प्रकल्पातील पाटण तालुक्यातील जिंती व निगडे गावातील 261 कुटुंबांचे पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. याबाबतही पुनर्वसन मंत्री यांच्याशी बैठकीचे आयोजन करुन या पुनर्वसनासाठी विशेष बाब म्हणून मंजुरी घेण्यात येईल.
वांग मराठवाडी प्रकल्पातील पाटण तालुक्यातील जिंती व निगडे प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसनासाठी जलसंपदा विभागाकडे निधी उपलब्ध आहे. हा निधी पुनर्वसनासाठी देण्याबाबत पुनर्वसन विभागाची मंजुरीही घेण्यात येईल, असेही पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत सांगितले.