पाटण तालुक्यातील नागरिकांच्या गैरसोयी होऊ नये याची प्रशासनाने दक्षता घ्यावी; पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पाटण तालुक्यात देखील पावसाचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे नागरिकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी फिल्डवर उतरून काम करावे, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रशासनास दिले.

पाटण तालुक्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शुक्रवारी घेतला. पाटण पंचायत समितीच्या लोकनेते बाळासाहेब देसाई भवनात झालेल्या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, प्रांताधिकारी सुनील गाढे, तहसीलदार अनंत गुरव आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीच्या काळात प्रशासनाने अलर्ट राहून पाटण तालुक्यातील घडामोडींवर लक्ष ठेवावे. या तालुक्यातील भूस्खलन व दरडप्रवण क्षेत्रातील नागरिकांचे स्थलांतर करावे. शाळा, महाविद्यालयांमध्ये त्यांची राहण्याची, जेवणाची आणि पिण्यासाठी स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी.

ग्रामसेवक, तलाठी व कोतवालांनी आपत्तीच्या काळात आपापल्या कार्यक्षेत्रातच राहावे. तालुक्यातील शाळांमधील शिक्षकांनी शाळा सुटल्यानंतर मुले सुरक्षित घरी पोहोचल्यानंतरच, शाळेतून बाहेर पडावे.

तालुक्यातील कुठल्याही गावातील विद्युत पुरवठा खंडित होणार नाही, याची दक्षता महावितरणने घ्यावी. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी रुग्णालयाच्या ठिकाणीच राहावे.