सातारा प्रतिनिधी । मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत 5 लाख 20 हजार 560 ऑनलाईन अर्ज भरले गेले आहेत. त्यापैकी 4 लाख 42 हजार 887 अर्जांना मंजुरी देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याने या योजनेत चांगले काम केले असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समिर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह सर्व प्रांताधिकारी, तहसीलदार संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालमंत्री देसाई यांनी काही महत्वाच्या सूचना आढावा बैठकीत केल्या. यावेळी देसाई म्हणाले की, तालुकास्तरावर गठीत केलैल्या समितीची बैठक घेऊन अर्जांना मंजुरी द्यावी. ज्या तालुक्यांची बैठक अद्याप झाली नाही त्यांनी ती त्वरित आयोजित करावी. मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र महिलांना मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करुन महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर राहूया. या योजनेसंदर्भात जिल्ह्यात मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करु.
महसूल पंधरवड्यात नागरिकांना योजनांचा लाभ द्यावा
महसूल पंधरवड्यानिमित्त प्रशासन सर्वसामान्यापर्यंत पोहचवत नागरिकांना शासनाच्या योजनेचा लाभ द्यावा, असे आवाहन पालकमंत्री देसाई यांनी देसाई यांनी केले. महसूल पंधरवड्यात शेतकऱ्यांविषयी राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष सहभाग घ्यावा. दिव्यांगांसाठी असणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन त्यांना प्रत्यक्ष लाभ द्यावा. यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांना सूचना द्याव्यात, असे सांगून पालकमंत्री देसाई यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचाही आढावा घेतला.