पाटण मतदार संघातील कामे आचारसंहिता लागण्यापूर्वी सुरु करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पाटण मतदार संघातील विविध विकास कामांना तसेच प्रकल्पांना शासनाकडून निधी उपलब्ध झाला आहे. आचार संहितेच्या पूर्वी मंजूर कामांची निविदा तात्काळ काढून कामे लवकरात लवकर सुरु करावीत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पाटण विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचा सविस्तर आढावा पालकमंत्री देसाई यांनी आज घेतला. या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचा आढावा घेताना पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पाटण मतदार संघातील विकास कामांसाठी निधी उपलब्ध आहे. मंजूर कामांची निविदा तात्काळ काढून कामे लवकरात लवकर सुरु करावीत. पर्यटन विकासाची कामेही सुरु करावीत. डोंगरी विकास निधीमधील कामांना तांत्रितक मान्यता देवून तसेच कोयना भूकंप पुनर्वसन निधीतील कामे तातडीने पूर्ण करावीत. त्याचबरोबर जिल्हा परिषदेकडील बांधकाम विभागानेही कामांची निविदा काढून प्रत्यक्षात कामे सुरु करावीत.

विघुत वितरण कंपनीला जिल्हा नियोजन व डोंगरी विकासमधून निधी देण्यात आला आहे. या निधीमधून लाईटचे पोल, डीपी, विद्युत तारा बदलने अशी कामे ताडीने सुरु करावीत. जिल्हा परिषदेकडील लघु पाटबंधारे विभागाने त्यांच्याकडील कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत यासाठी मिशन मोडवर काम करावे, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजने कामांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्याचे प्रस्ताव शासनाकडे तातडीने पाठवावेत. पाटण मतदार संघात पाणंद रस्त्यांचे 201 कार्य आदेश देण्यात आले आहेत ही कामे तातडीने पूर्ण करावीत. पाटण तालुक्यातील निकावणे बंधाऱ्यांचे पाणी केरा नदीत आल्यानंतर शेतकऱ्यांना हे पाणी 100 मिटरवर मिळण्यासाठीचा प्रस्तावही सादर करावा. बोर्गेवाडी ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घ्यावी, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.