सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या आणि मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वर येथे एप्रिल महिन्यात महाराष्ट्र पर्यटन विभागातर्फे “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल” (Mahabaleshwar Tourism Festival) चे आयोजन करण्यात आले आहे. 26 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन हे सध्या भारत दौऱ्यावर असून त्यांनी मुंबईतील राजभवन येथे महामहीम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत उपस्थित राहून पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांना एप्रिलमध्ये सातारा (महाबळेश्वर) येथे होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचे निमंत्रण दिले.
महाबळेश्वर येथे आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्राचा महा फेस्टिवल या महोत्सवाच्या तयारीचा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी मंत्रालयातील दालनात नुकताच आढावा घेतला आहे. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या वतीने व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिह्यातील महाबळेश्वर पाचगणी येथे एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय पर्यटन महोत्सव होणार आहे.
तीन दिवस चालणार महोत्सव
महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग, पर्यटन संचालनालयाद्वारे राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाबळेश्वर पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 26 ते 28 एप्रिल 2025 दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. पर्यटन विभाग व स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने आयोजित करण्यात येणाऱ्या तीन दिवसीय महोत्सवात प्रेक्षणीय स्थळे, स्थानिक कला – संस्कृती , खाद्यसंस्कृतीची ओळख पर्यटकांना व्हावी आणि या माध्यमातून पर्यटन वृद्धी व्हावी हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे .
महोत्सवाला देश परदेशातील पर्यटन प्रेमी भेटी देणार
विविध देश आणि भारत यांच्यातील पर्यटन वाढीसाठी अधिक गती देण्यासाठी राज्य शासनाने इतर राज्यासहित विविध देशांना निमंत्रित करण्यात आले आहे. परिणामी या महोत्सवाला देश परदेशातील पर्यटन प्रेमी मोठ्या प्रमाणात भेटी देणार आहेत.
पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी सकारात्मक चर्चा
शंभूराज देसाई यांनी लक्सन यांना एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाकरिता निमंत्रण दिले. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील पर्यटन विकासासाठी राज्य शासन करत असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांना दिली. राज्यातील गडकिल्ले आदी ऐतिहासिक, तसेच नैसर्गिक स्थळे आणि धार्मिक व आध्यात्मिक तीर्थस्थाने यांनी महाराष्ट्र समृद्ध आहे. या समृद्ध वारशाचा अनुभव घेण्यासाठी न्यूझीलंडच्या पर्यटकांनी महाराष्ट्रात जरूर यावे. यादृष्टीने आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली.
‘या’ परदेशी पाहुण्यांना दिलयं निमंत्रण
दरम्यान, यापूर्वी ही पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचे स्वित्झर्लंडचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) मार्टिन मायर, जपानच्या वाकायामा प्रांताच्या शिष्टमंडळ यांनाही मुंबई येथे सातारा जिह्यातील महाबळेश्वर पाचगणी येथे होणाऱ्या महाराष्ट्र पर्यटनाचे निमंत्रण दिले आहे. दरम्यान, नुकतेच न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांनाही महाराष्ट्र पर्यटनाचे मंत्री देसाई यांनी निमंत्रण दिले.
पर्यटन महोत्सवात होणार ‘हे’ महत्वाचे कार्यक्रम
महाबळेश्वर पर्यटन होत्सवात स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे कार्यक्रम तसेच नामांकीत कलाकारांचा सहभाग असलेल्या कार्यक्रमांचे आयोजन करणे. त्याचप्रमाणे, स्ट्रॉबेरी व कृषी पर्यटन महोत्सवाचे आयोजन, महाबळेश्वर परिसरातील पाचगणी, कास पठार, कोयनानगर, तापोळा, गड-किल्ले दर्शन व इतर पर्यटन स्थळ दर्शन सहलीचे आयोजन , पर्यटकांसाठी विविध श्रेणीच्या तंबू निवास उभारणी, पॅराग्लाडींग, पॅरामोटरींग, जलक्रिडा, ट्रेकींग, रॉक क्लायबींग, घोडेस्वारी इ. विविध साहसी उपक्रम राबविणे, स्थानिक बचत गटांचे हस्त कला-कृतीचे प्रदर्शन व विक्रीचे दालन उभारणी, स्थानिक पाककलाकृती संस्कृती व खाद्य महोत्सव दालन उभारणी, महाबळेश्वर येथील विविध प्रेक्षणीय स्थळे व पुरातन मंदिरांचे दर्शन इत्यादी कार्यक्रम आयोजित केले आहेत.