मूळगाव पुलाची उंची वाढवून याठिकाणी मोठा पूल उभारणीसाठी निधी देणार : पालकमंत्री शंभूराज देसाईं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण प्रतिनिधी । मुसळधार पावसामुळे व कोयना धरणातून नदीपात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कोयना नदीवर कमी उंचीचा मूळगाव पूल पाण्याखाली जाण्यामुळे ५-७ गावांना संपर्कहीन व्हावे लागते. हे कायमचे दुखणे लवकरच बंद होण्यासाठी मूळगाव पुलाची उंची वाढवून याठिकाणी मोठा पूल उभारणीसाठी निधी देणार आहे. मोरणा विभागातील कुसरुंड येथील छोटा बंधाऱ्यावरील तुटलेला रस्ता नव्याने उभारणार असल्याचे पालकमंत्री देसाई म्हटले.

पालकमंत्री देसाई यांनी कोयना धरणाची व पूरग्रस्त भागाची नुकतीच पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कोयना जलविद्युत प्रकल्पाचे मुख्य अभियंता संजय चोपडे, कार्यकारी अभियंता नितीश पोतदार, तहसीलदार अनंत गुरव, मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सावळाराम लाड, अशोकराव पाटील, शैलेंद्र शेलार, नथुराम सावंत, उपअभियंता आशिष जाधव ,सपोनि संदीप शितोळे आदी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. नदीकाठावरील गावांनी अतिवृष्टी व धरणातून पाणी सोडण्याच्या काळात सावधानता व दक्षता बाळगावी. कोयना प्रशासनाच्या पूर नियोजनाचे काम उत्तम चालले आहे.

कोयना धरणाबरोबर प्रकल्पाची सुरक्षा करण्यासाठी असलेल्या १० पोलीस चौक्यांमध्ये लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येणार असून कोयना पोलीस ठाण्याबरोबर या ठिकाणी मनुष्यबळ देण्यावर आपला भर असणार आहे. धरणातून विसर्ग सोडताना धरण व्यवस्थापनाने दक्षता घ्यावी.

पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणात १०४ टीएमसी पाणीसाठ्याची आवक झाली आहॆ. आतापर्यंत धरणाची जलपातळी नियंत्रित करण्यासाठी २८ टीएमसी पाणीसाठा सोडून देण्यात आला आहे. धरणातून ६० हजार क्युसेक पाणी नदीपात्रात सोडून जलपातळी नियंत्रित करणार आहे. १५ सप्टेंबरपर्यंत धरणात १०० टीएमसी पाणीसाठा ठेवणार असल्याचे कोयना धरण व्यवस्थापनाचे कार्यकारी अभियंता नितीश पोतदार यांनी म्हटले.