पाटण प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील जनतेच्या प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या कामांचा निपटारा होण्यासाठी जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या दरबारात आलेल्या अर्जांवर सकारात्मक निर्णय घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
पाटण पंचायत समिती येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जनता दरबार घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल, यशराज देसाई उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जनता दरबारात येणाऱ्या प्रत्येक अर्जांवर दोन महिन्याच्या आत कार्यवाही होणार आहे. ह्या अर्जांबाबत जिल्हाधिकारी व माझ्याकडून वेळोवेळी आढावा घेण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी निधी कमी पडून देत नाहीत.
पाटण येथे आगळावेगळा असा जनता दरबार आयोजित करण्यात आला आहे. या दरबारात नागरिकांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी. आपल्या अर्जांवर दोन महिन्याच्या आत प्रशासन सकारात्मक निर्णय घेईल. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी प्रशासन आपल्या दारात येणे हेच शासनाला अपेक्षित असल्याचेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी श्री. डुडी म्हणाले, पाटण येथे होत असलेल्या जनता दरबारात जिल्हास्तरीय अधिकारी उपस्थित आहेत. जनता दरबारात आलेल्या अर्जांवर दोन महिन्यात निर्णय घेण्यात येईल. आलेले अर्ज प्रत्येक विभागाला पाठविण्यात येतील. विविध योजनांच्या लाभासाठी अपूर्ण असलेले कागदपत्रे आपल्या घरी येऊन कर्मचारी पूर्तता करतील , नागरिकांनाही आता जिल्हास्तरावर हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही. अशाच पद्धतीने प्रत्येक तालुक्यात जनता दरबाराचे आयोजन करून जनतेचे प्रश्न सोडवण्यात येतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या जनता दरबारास जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, उपजिल्हाधिकारी विजया यादव, पाटणचे प्रांत अधिकारी सुनील गाढे, तहसीलदार आनंद गुरव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध योजनांचे लाभ वाटप
जनता दरबार कार्यक्रम प्रसंगी लाभार्थ्यांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले. यामध्ये संजय गांधी निराधार योजना, शिधापत्रिकांचे वाटप, पाणंद रस्ते कार्यारंभ आदेश, दिव्यांगांना सायकलीचे, अंगणवाडी सेविकांना मोबाईल व वजन काट्याचे वाटप, यासह विविध योजनांच्या लाभाचे वाटप पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.