सातारा प्रतिनिधी | पाटण तालुक्यातील पांढरपाणी येथील वन जमिनी ताब्यात घेण्याबाबत नुकतीच पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत वन विभाग व अन्य संबंधित यंत्रणांनी ग्रामस्थांना नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. दुर्गम भागात राहणारे अनेक ग्रामस्थ अशिक्षीत असतात. शासकीय यंत्रणांनी त्यांच्या गावात जावून त्या ठिकाणी शिबीरे लावावीत आणि लोकांचे प्रस्ताव परिपूर्ण करुन घ्यावेत, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
पांढरपाणी येथील वन जमिनी ताब्यात मिळण्याबाबत ग्रामस्थांनी केलेल्या मागणीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून आम्ही जमीनी कसत आहोत. त्या जमिनी पुन्हा ताब्यात द्याव्यात, अशी मागणी पांढरपाणी येथील ग्रामस्थांनी शासनाकडे केली आहे. यासाठी वन हक्क समिती अस्तित्वात येणे आवश्यक आहे. अनेक जुन्या लोकांकडे या संबंधात काही कागदपत्रे उपलब्ध आहेत. या सर्वांची पांढरपाणी येथे जावून संबंधित यंत्रणांनी छाननी करावी. त्यासाठी शिबीराचे आयोजन करावे. आपण जनतेचे सेवक आहोत याची जाणीव ठेवून अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काम करावे. दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांना पुन्हा पुन्हा हेलपाटे मारावे लागणार नाहीत याची दक्षता घ्यावी. सदरचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती तातडीने कार्यवाही करावी.
कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाच्या गावठाणांमध्ये सर्व नागरी सुविधा देण्यात याव्यात. तसेच पुनर्वसन झालेल्या प्रकल्पग्रस्तांना मिळालेल्या जमिनींचे सातबारा त्यांच्या नावावर करावा. संकलन झालेल्या याद्या प्रकल्पग्रस्तांना उपलब्ध करुन द्याव्यात, अशा सूचनाही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत दिल्या.