पाटण प्रतिनिधी । आज पाटण येथे झालेल्या जाहीर सभेमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे उमेदवार पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांच्या या टीकेमुळे शंभुराज देसाई चांगलेच भडकले. त्यांनीही उद्धव ठाकरे यांना लगेच प्रत्युत्तर दिले. “मी माझी पत्नी प्राप्तिकर भरतो, त्यामुळे कुठल्याही आणि कसल्याही चौकशीला सामोरं जाण्यास मी तयार आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर राज्याला कुठलं व्हिजन देईन. याबाबत उद्धव ठाकरे काही बोलले का? माझ्या मुलाचं लग्न काढलं. मला लुटमार मंत्री म्हणाले. याचा अर्थ पक्षाचं धोरण त्यांच्याकडे नाही. मतदारसंघाच्या विकासाचं धोरण त्यांच्याकडे नाही. सरकार आलं तर काय करेन हेही ते बोलत नाहीत. त्यामुळे ज्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तसेच सभेला जमा झालेला अतिप्रचंड जनसमुदाय पाहून त्यांनी कदाचित अशा प्रकारची टीका केली असावी, असे देसाई यांनी म्हंटले.
उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत टीका केल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्या आजोबांच्या राजकीय जीवनावर भाष्य करण्याइतपत उद्धव ठाकरे हे मोठे आहेत असं मला वाटत नाही. माझ्या आजोबांचे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे काय संबंध होते, याबाबत बाळासाहेबांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे. दिवंगत बाळासाहेब देसाई हे काँग्रेसमधून मंत्री झाले होते, हे सत्य आहे.
परंतु पुढे काँग्रेसकडून आमच्या कुटुंबावर जो राजकीय अन्याय झाला, त्यामुळे आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी मला शिवसेनेत घेतलं होतं. मनोहर जोशी हे त्याचे साक्षीदार होते. आम्ही आजही बाळासाहेब ठाकरे यांच्या त्याच शिवसेनेत आहोत आणि धनुष्यबाण या चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. आम्ही बाळासाहेबांचे आणि हिंदुत्वाचे विचार कधीही सोडलेले नसल्याचे देसाई यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
आमचा होम मिनिस्टरच गहार निघाला. पोलीस यंत्रणेच्या मदतीने गद्दारांना गुजरातला पळून जायला मदत केली, असा हल्लाबोल उध्दव ठाकरेंनी साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंवर केला. दिवंगत बाळासाहेब देसाईंच्या पश्चात काँग्रेसमध्ये कुणी विचारेना म्हणून तो आपल्याकडे आला. शिवसेनेसोबत बाळासाहेब देसाईंचे ऋणानुबंध होते, म्हणून त्याला शिवसेनेत घेतलं. परंतु, हा लूटमार करणारा, करंटा निघेल, हे माहीत नव्हतं. मी काँग्रेससोबत गेलो म्हणून बडखोरी केल्याचे कारण हे गद्दार सांगत आहेत. मग इथल्या लूटमार मंत्र्यांचे आजोबा पूर्वी काँग्रेसमध्येच मंत्री होते ना? हा गद्दारही तिकडेच होता. नंतर कोणी विचारेना म्हणून आपल्याकडे आला. आपणच त्याला मंत्री केलं. शिवसेनाप्रमुखांचा आदेश म्हणून तुम्ही या सगळ्या गहारांची ओझी खांद्यावर घेतली होती. आता मी आदेश देतो की, या गद्दारांची ओझी आता खाली उतरवा, असे ठाकरे यांनी म्हटले.