कराड प्रतिनिधी । सध्याचा पाणीप्रश्न तात्काळ सोडविण्याकरिता नव्याने स्थापन केलेल्या नगरपंचायतीना नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेमधून पाटण नगरपंचायतीला 1 कोटी रुपये निधी मंजूर करणेत आलेला आहे. एका महिन्यात कामाची सुरवात करण्याचे व जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करण्यात आलेला 60 लक्ष रुपयांचे जल शुद्धीकरण केंद्राचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटणच्या मुख्याधिकारी यांना दिले आहेत.
पालकमंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, पाटणचा पाणी पुरवठा सुरळीत रहावा यासाठी कायमस्वरुपी उपाययोजना कराव्यात. आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यासाठी वापर करावा. केंद्र पुरस्कृत अमृत 2.0 योजनेमधून पाटण नगरपंचायतीने शहरासाठी रुपये 21 कोटी रुपये इतक्या रकमेची नवीन पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेली आहे. केंद्र शासन स्तरावर सदर योजनेंतर्गतचा प्रस्ताव मंजुरीच्या स्तरावर असून लवकरच मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा करु. केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर राज्य शासनाकडून तातडीने प्रशासकीय मान्यता मिळेल व एक महिन्यात काम सुरू करण्यात येईल. प्रस्तावित योजनेमधून शासकीय मानकांनुसार प्रती माणसी 135 लिटर इतका पाणी पुरवठा केला जाणार असून योजनेमधून महिन्यात शहरात पाणीपुरवठा करण्याकरिता 28.6 किमी. इतक्या लांबीच्या वितरण प्रणालीचे जाळे असणार आहे.
या प्रकल्पांतर्गत जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती प्रस्तावित असून त्याची जलशुद्धीकरण क्षमता 5 MLD इतकी होणार आहे. तसेच नविन 2 उंच टाकी प्रस्तावित असून त्याची क्षमता अनुक्रमे 2.55 लक्ष लिटर व 3.46 लक्ष लिटर इतकी आहे. तसेच एक बैठी टाकी प्रस्तावित असून त्याची क्षमता 1.80 लक्ष लिटर असणार आहे. सदर योजनेमुळे पाटण शहराची सन 2054 पर्यंतची चोवीस हजार सातशे बावन्न इतक्या अंदाजित लोकसंख्येची पाण्याची मागणी पूर्ण होणार असून या योजनेमधून चार हजार चारशे बेचाळीस नवीन नळ जोडण्या प्रस्तावित आहेत. या योजनेमुळे पाटण शहराला शुद्ध पाणीपुरवठा होणार असून सदर योजना शहरास 24 X 7 पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल असणार आहे.