सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी पुन्हा शंभूराज देसाई; गोरे, मकरंद पाटील अन् शिवेद्रसिंहराजे झाले ‘या’ जिल्ह्याचे पालकमंत्री

0
32

सातारा प्रतिनिधी | संतोष गुरव

महाराष्ट्रात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर, जिल्हानिहाय पालकमंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, यामध्ये सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

सातारा जिल्ह्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील चार कॅबिनेट मंत्री आहेत, ज्यामध्ये शंभूराज देसाई, श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे आणि मकरंद पाटील यांचा समावेश आहे. शंभूराज देसाई यांनी पर्यटन, खणीकर्म आणि सैनिक कल्याण विभाग हाती घेतले आहेत. पूर्वी त्यांनी सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली आहे आता पुन्हा त्यांना सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जयकुमार गोरे यांचा माण मतदारसंघ हा माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांना या जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे.

सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा गेले काही दिवस होती परंतु त्यांची लातूरच्या पालकमंत्री पदी नियुक्ती करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील यांची बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यात मदत व पुनर्वसन कार्यक्रमांना प्राधान्य दिले जाईल.

सातारा जिल्ह्यात महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील चार कॅबिनेट मंत्री असल्याने या जिल्ह्याचे राजकीय समीकरणे आणखी मजबूत होणार आहेत. शंभूराज देसाई, जयकुमार गोरे, शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मकरंद पाटील यांच्या नियुक्तीमुळे संबंधित जिल्ह्यांमध्ये विकासाच्या प्रकल्पांना चालना मिळेल. या नियुक्तींमुळे महायुती सरकारची जिल्हा स्तरावरील उपस्थिती आणखी बळकट होणार आहे.