प्रवाशांना लुटणाऱ्या 3 जणांना अटक; दुचाकीसह 3.40 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील बसस्थानकाबाहेर एक प्रवाशाला तीन जणांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्याच्याकडील गळ्यातील सोनसाखळी, बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल आणि खिशातील पैसे लुटल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेतील तीन संशयितांना शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने अखेर बेड्या ठोकल्या आहेत.

रफिक युसुफ मुलाणी (वय 31, रा. पुष्करमंगल कार्यालय समोर भोसले चाळ सातारा), आकाश सुधीर इंगवले (वय 21, रा. 55 मेहर देशमुख कॉलणी करंजे पेठ सातारा),ओयस आयाज खान (वय 27, रा. 1 बुधवार पेठ सातारा) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सिकंदर जगन्नाथ पवार हे दि. 06 जुलै रोजी मुंबई ते इस्लामपूर असा बसने प्रवास करीत होते. ते प्रवास करीत असलेली एसटी बस सायंकाळच्या सुमारास सातारा स्थानक येथे जेवन करण्याकरीता थांबवण्यात आली. यावेळी सिकंदर पवार हेही जेवन करण्यासाठी सातारा बस स्थानकाच्या बाहेरील बाजूस आले असता अचानक 3 अज्ञात इसमांनी त्यांना हाताने व लाथा बुक्यानी मारहान करुन सिकंदर यांच्या गळयातील सोनसाखळी, बोटातील सोन्याची अंगठी, मोबाईल व खिशातील रोख रक्कम जबरदस्तीने काढुन घेतली. या घटनेनंतर सिकंदर पवार यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात चोरीबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.

शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक बधे यांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. त्याअनुषंगाने तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की सदर गुन्हयातील सिकंदर यांना एका चायनिजच्या दुकानावर दोन संशयीत इसमांनी मारहान करुन त्यांच्याकडील मोबाईल, सोन्याची चैन, अंगठी व रोख रक्कम जबरस्तीने काढुन घेतली आहे.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी चायनिजच्या दुकानावर जाऊन चौकशी केली असता आकाश इंगवले व ओयस खान या दोघांनी मारहान केल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही संशयितांना सातारा बस स्थानक परिसरात सापळा रचून ताब्यात घेतले. दोघांनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात आपला मित्र रफिक मुलाणी याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यालाही ताब्यात घेतल्यानंतर त्याने मोबाईल, रोख रक्कम व चैन काढुन घेतल्याचे कबूल केले.

अशा प्रकारे शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेने जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस 6 तासाच्या आत जेरबंद करुन गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि चोरलेल्या वस्तू, असा 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बधे, सहाय्यक फौजदार ए. ए. बागवान, हवादार सुरेश घोडके, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे यांनी ही कारवाई केली.