शाहुपुरी पोलिसांनी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळल्या, साडे सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक वर्षापूर्वी झालेल्या चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत चोरट्यांच्या आंतरजिल्हा टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही टोळी मराठवाड्यातील असून त्यात चार महिला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. त्यांच्याकडून सहा मोबाईल, रोकड आणि चारचाकी वाहन, असा साडे सहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

शाहुपूरी पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजवाडा, मोती चौक, खणआळी, देवी चौक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना 4 महिला संशयास्पदरित्या फिरताना आढळल्या. एक वर्षापूर्वीच्या चोरीच्या गुन्ह्यातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता चार संशयित महिलांमधील दोन महिला त्या गुन्ह्यातील असल्याची खात्री झाली.

संशयित महिलांना पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने बाजार पेठेत फिरत असल्याची कबुली दिली. तसेच आणखी 2 पुरुष साथीदार वाढे फाटा याठिकाणी चारचाकी वाहन घेवून थांबले असल्याचे सांगितले. दोन्ही पुरूषांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. अल्ताफ सय्यद पठाण (रा. विहा मांडवा, ता. पैठण जि. छ. संभाजीनगर), रमेश बाबासाहेब काळे (रा. येळंबघाट, ता. जि.बीड), जान्हवी अंगद पवार (रा. रामगव्हाण, ता. अंबड, जि. जालना), सुरेखा ज्ञानेश्वर काळे, बरखा सचिन पवार (दोघीही रा. वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना), गौरी रामदास भोसले (रा. गेवराई, ता. जि. बीड), अशी संशयितांची नावे आहेत.

शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑगस्ट 2023 मध्ये चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याकडुन 6 मोबाईल, गुन्ह्यात वापरत असलेले वाहन व रोख रक्कम असा एकुण 6,44,970/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्याचा अधिक तपास उप-निरीक्षक कृष्णा गुरव करीत आहेत.