पोलिसांच्या तावडीतून पळालेला आरोपी अखेर सापडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पंधरा दिवसांपूर्वी शाहूपुरी पोलिसांच्या तावडीतून एक आरोपी पळाल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पळालेल्या आरोपीला पकडण्यात शाहूपुरी पोलिसांना यश आले असून, त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

सूरज हणमंत साळुंखे (वय २२, सावली, सातारा) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहूपुरी पोलिसांनी सूरज साळुंखे याला ३० डिसेंबर २०२३ रोजी दुपारी दुचाकी चोरी प्रकरणात अटक केली होती. त्याच्याकडून चोरीची दुचाकीही पोलिसांनी जप्त केली. सायंकाळी त्याला न्यायालयातून कारागृहात नेण्यात येत होते. कारागृहासमोर आणल्यानंरत त्याच्या हातातील बेड्या पोलिसांनी सोडल्या. त्यामुळे तो पोलिसांच्या हाताला हिसका मारून पळून गेला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो सापडला नाही. कारागृहासमोरूनच चोरटा पळाल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती.

पोलिसांनी तातडीने त्याला पकडण्यासाठी दोन पथके तैनात केली होती. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही त्याचा शोध घेत होते. दरम्यान, सूरज साळुंखे हा मंगळवारी दुपारी सातारा बस स्थानकात आला असल्याची माहिती हवालदार दादा राजगे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने बस स्थानकात जाऊन त्याला ताब्यात घेतले. गेल्या पंधरा दिवसांपासून त्याच्या मागावर असलेल्या पोलिसांनी त्याला अटक होताच सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलिस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.