साताऱ्यात घडला चोरीचा अजब प्रकार; पगार कमी देतो म्हणून मालकाच्या घरात चोरी करणाऱ्या कामगारास पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । एखादी चोरीची घटना घडली कि त्या चोरी करणाऱ्यास पोलिस पकडतात. त्याला पकडल्यानंतर त्यामागचे कारण विचारल्यास कुणी गरिबीचे कारण सांगतो तर कुणी पैसे मिळवण्यासाठी आपण चोरी केल्याचे कारण पुढे करतो. मात्र, साताऱ्यात शहरातील एका कापड व्यावसायिकाच्या घरात त्याच्याच दुकानात काम करणाऱ्या कामगाराने चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. सदर कामगार चोरास कारण विचारले असता त्याने देखील भन्नाट उत्तर दिले आहे. मालक आपल्याला कमी पगार देतो म्हणून आपण चोरी केल्याचे कामगाराने सांगितले आहे. चोरीच्या घटनेनंतर संबंधित चोरट्यास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ८ लाख ८० हजारांच्या ऐवज हस्तगत केला आहे. अवघ्या १८ तासांत शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.

आदित्य सुभाष कापसे (वय १९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजकुमार उधानी (वय ५९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचे साताऱ्यात कापड दुकान आहे. या दुकानात आदित्य कापसे हा गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. दरम्यान, कास येथे दि. २५ रोजी दुपारी एका काैटुंबिक कार्यक्रमाला उधानी कुटुंबीय गेले होते. ही संधी साधून दुकानातील कामगार आदित्य याने रात्री साडेसात वाजता मुख्य दरवाजाचे कुलून तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.

बेडरुममधील लाकडी कपाटातील ड्राॅव्हरमधून १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, ९६ हजारांची रोकड असा सुमारे ८ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ही चोरी दुकानातील कामगार आदित्य कापसे याने केल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्याने आपल्याला दहा हजार रुपये कमी पगार असल्यामुळे आपण चोरी केल्याची कबुली दिली.

त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले दागिने आणि पैसे त्याने पोलिसांना काढून दिले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे, अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.