सातारा प्रतिनिधी | शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीचा गुन्हा उघडकीस आणत गुन्हे प्रकटीकरण शाखेने दोन चोरट्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील १,७०,००० रूपये किंमतीचे अडीच तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. अबुहसन तेजीबा ईराणी (वय ४३, रा. वॉर्ड क्रमांक ०१ निरा रेल्वे स्टेशनजवळ निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि रजा मास्तर ईराणी (वय ५५, रा. कामगार भवनच्या पाठीमागे किर्लोस्करवाडी पलूस, जि. सांगली), अशी संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयित हे चुलते-पुतणे आहेत.
शाहुपूरी पोलीस ठाण्यात २५ जून रोजी चोरीची फिर्याद दाखल झाली होती. पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे व पोलीस अंमलदारांना गुन्हा उघडकीस आणण्याची सूचना केली होती. चोरीच्या गुन्ह्यातील संशयीत लोणंद व निरा परिसरात असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली. गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून एका संशयिताला ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संशयिताने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच या गुन्ह्यात किर्लोस्करवाडी येथील आपल्या चुलत्याचाही सहभाग असल्याची माहिती दिली. लागलीच गुन्हे प्रकटीकरन शाखेने किर्लोस्करवाडी येथे सापळा रचून दुसऱ्या संशयितास ताब्यात घेतले. त्यानेही गुन्हयाची कबुली दिली. तो सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोरीच्या गुन्ह्यात ९ वर्षापासून वॉन्टेड होता. यामुळे संशयितांकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले.
साताऱ्याचे पोलीस उपअधीक्षक राजीव नवले, पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अधिकारी कुमार ढेरे, अंमलदार सुरेश घोडके, निलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, सुमित मोरे, संग्राम फडतरे, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, तनुजा शेख यांनी ही कारवाई केली.