सातारा प्रतिनिधी । साताऱ्यातील शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या वतीने सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्री व वाहतुक करणाऱ्या एका युवकास ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडून सुमारे 92 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. अन्वर नजीर सय्यद (वय 45, रा. 203 बुधवार पेठ सातारा ता. जि. सातारा) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी कि, सातारा शहरामध्ये तंबाखु जन्य पदार्थाची विक्री व वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांनी पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांना सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी सहा पोलीस निरीक्षक प्रशांत बधे व गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या स्टाफला अवैध धंद्यांबाबत माहिती काढुन त्यांच्यावर कारवाई करणे बाबत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. त्यानंतर दि. 20 जुलै रोजी शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक धनंजय फडतरे यांना करंजे नाका ते मेळाचा ओढा जाणारे रोडवरुन एक इसम दुचाकी (क्रमांक MH 11 CN 7584) वरुन बेकायदा बिगर परवाना गुटख्याची चोरटी वाहतुक करणार असल्याची माहिती मिळाली. त्याची माहिती फडतरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास दिली.
त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सपोनी प्रशांत बधे व पोलीस अंमलदार यांनी करंजे नाका ते मोळाचा ओढा जाणारे रोडवर सतर्क पेट्रोलिंग करुन सापळा रचला. त्यानंतर एक दुचाकी (क्रमांक MH 11CN 7584) ही करंजे नाका झेंडा चौक येथे आली असता पोलीसांनी दुचाकीचा पाठलाग करुन गाडी थांबवली. तेव्हा पोलीसांनी दुचाकीची अधिक तपासणी केली असता त्यावर दोन पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु असल्याचे आढलून आले. त्यानंतर पोलीसांनी दुचाकीवरील इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता संबंधित बिगरपरवाना वाहतुक करत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडुन केसरयुक्त विमल पान मसाला तंबाखु माल व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकुण सुमारे 92 हजार 130 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आला. तसेच संबंधित इसमाविरुद्ध शाहुपुरी पोलीसांनी गुटखाबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर पोलीस अधिक्षक बापु बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स.पो.नि. श्री. प्रशांत बधे, पो. हेड कॉ. सुरेश घोडके, पो. ना. मनोज मदने, निलेश काटकर, महेश बनकर, अभय सावळे पो.कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत, स्वप्निल पवार, सुमित मोरे यांनी केली आहे.