सातारा जिल्ह्यात केवळ सातच लाडक्या बहिणी रिंगणात; आठ मतदारसंघात 109 पुरुष उमेदवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदार संघात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत इच्छुकांसह उमेदवारांचे लक्ष आहे ते लाडक्या बहिणींच्या मतांकडे होय. मात्र, जिल्ह्यात आठ विधानसभा मतदारसंघात सात महिला उमेदवार निवडणूक रीगणात उतरल्या आहेत. त्यापैकी चार उमेदवार या अपक्ष निवडणूक लढवित आहेत. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ या वाई मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, फलटणला बहुजन समाज पार्टीकडून प्रतिभा शेलार तर कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रीय स्वराज्य सेनेकडून सीमा पोतदार आपले नशीब आजमावत आहेत.

सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांतील मतदारांची संख्या २६ लाख २८ हजार ८७१ इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या तब्बल १३ लाख ३१ हजार २५४ इतकी आहे. तर १२ लाख ९७ हजार ५०५ महिला मतदारांची संख्या आहे. सातारा जिल्हा हा राजकारणाचा केंद्रबिंदू राहिला आहे. जिल्ह्यातील आजवरच्या निवडणुकांचा इतिहास पाहिला तर पूर्वीपासूनच राजकारणात पुरुष मंडळींचे पारडे जड राहिले आहे.

शालिनीताई पाटील, प्रेमलाकाकी चव्हाण, प्रभावती सोनवणे वगळता जिल्ह्यातील अन्य महिला उमेदवारांना राजकारणात आपला ठसा उमटविता आलेला नाही. तीन-चार दशकांपासून ही परिस्थिती ‘जैसे थे’ असून, पुरुष मंडळींचा राजकारणातील दबदबा आणखीन वाढतच चालला आहे.

राजकीय पक्षांमध्ये वेगवेगळे सेल कार्यरत असतात. त्याप्रमाणे महिलांची आघाडी देखील स्वतंत्रपणे असते. प्रमुख राजकीय पक्षात तर. गल्लीपासून दिल्लीपर्यंत पदाधिकारी निवडले जातात. महिलांनी राजकारणात सक्रिय झाले पाहिजे यासाठी राजकीय नेतेमंडळी आवाहन करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण दिले आहे. परंतु आजही बऱ्याच ठिकाणी महिला केवळ सहीपुरत्या कामकाज करतात. प्रत्यक्षात त्यांचे पती किंवा इतर मंडळी त्यांच्या नावाने कारभार करतात असे दिसून येते. लोकसभा, विधानसभेत महिलांना आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांनी काही जिल्ह्यात महिलांना प्रतिनिधित्व दिले आहे.

यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. प्रतिष्ठित राजकीय पक्षाकडून लाडक्या बहिणींना अधिक उमेदवारी दिली जाईल असे चित्र होते. परंतु जिल्ह्यात उलट चित्र दिसून आले. काही प्रमुख राजकीय पक्षांनी ‘मेरिट’चा विचार करून तसेच काही मतदारसंघात सक्षम उमेदवार नसल्याचे लक्षात घेत महिलांना डावलले आहे.

सातारा जिल्ह्यातील मतदार संघ निहाय मतदार संख्या

फलटण विधानसभा : पुरुष – १,७२,४५९, महिला – १.६५,९९१
वाई विधानसभा : पुरुष – १,७३,२२८, महिला – २.७२,७९८
कोरेगाव विधानसभा : पुरुष – १,६१.७२०, महिला – १.५७,०६८
माण विधानसभा : पुरुष – १,८३.१०१, , महिला – १,७४,७३१
कराड उत्तर विधानसभा : पुरुष – १.५४.७४७, महिला – १.५०,०१९
कराड दक्षिण विधानसभा : पुरुष – १,५९.०७७, महिला – १.५४.१७१
पाटण विधानसभा : पुरुष १,५६.१००, महिला – १.५२,२५१
सातारा विधानसभा : पुरुष – १,७०.८२२, महिला – २०१००४
एकूण : पुरुष – १३.३१,२५४, महिला – १२,९७,५०५