सातारा प्रतिनिधी | सालपे, ता. फलटण येथील बसस्थानक परिसरात सुमारे दोन वर्षापूर्वी एकाचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील दोघा आरोपींना सत्र न्यायालयाने जन्मठेप व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सालपे येथे दि ३० नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास लोणंद- सातारा रस्त्यावरील बस स्थानक परिसरातील कैलास हॉटेल समोरील पिंपळाच्या झाडाखाली सालपे येथील सौरभ संजय जगताप व त्याचा भाऊ गौरव संजय जगताप यांनी आपापसांत संगनमत करुन दारु पिण्याचे कारणावरुन बापू संभाजी निकम (वय 38, रा. शेरेचीवाडी ता. फलटण) यास लाकडी दांडक्यानी त्याचे डोक्यात, कपाळावर, डावे हाताचे मनगटावर, छातीवर, बरकडीवर मारहाण करुन त्याचा निघृण खुन केला होत. त्याबाबत लोणंद पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. अडकर यांचे कोर्टात चालु होती. सरकारतर्फे सातारा येथील सहायक संचालक व सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांनी खटल्याचे कामकाज पाहिले. एकूण अकरा साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी एक साक्षीदार तसेच पोस्टमार्टम करणारे वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. केवळ परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांचे साक्षीवरुन तसेच सरकारी वकीलांचा युक्तीवाद व आरोपीनी केलेल्या कृत्याबाबत न्यायालयाचे समोर आलेला पुरावा व सरकारी वकीलांचा युक्तीवाद ग्राह्य मानुन न्यायाधीशांनी काल दि. ३० नोव्हेंबर रोजी यातील आरोपी सौरभ संजय जगताप व गौरव संजय जगताप यांना भादवि कलम ३०२ कलमान्वये जन्मठेप व दहा हजार रु दंड तसेच दंड न दिलेस एक वर्ष साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.
या गुन्ह्य़ाचा तपास लोणंदचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, सुशील बी. भोसले तसेच दप्तरी मदतनीस महेश सपकाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक तसेच पैरवी अधिकारी, बापुराव मदने पोना यांनी कामकाज पाहिले. याकामी पोलीस प्रॉसिक्यूशन स्कॉडचे पोलीस उपनिरीक्षक उदय दळवी, सुनील सावंत, पोहवा गजानन फरांदे, मंजुर मणेर व मपोहवा रहिनाबी शेख यांनी मदत केली.