शरद पवारांच्या जिद्दी समर्थक ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे यांचे निधन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांचे विश्वासू सहकारी सुभाषराव शिंदे (वय ७७) यांचे पुणे येथील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांनी आपल्या निवासस्थानाला ‘जिद्द’ असं नाव दिलं होतं. मात्र, नियतीपुढं सुभाषरावांची जिद्द अखेर हारली.

गेल्या काही दिवसापासून सुभाषराव शिंदे आजारी होते. त्यांच्यावर पुणे येथील रुबी रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यांची रुबी हॉल येथे जाऊन तब्येतीची विचारपूस केली होती. मात्र, नियतीपुढं सुभाषरावांची जिद्द हारली आणि सुभाषरावांनी अखेरचा श्वास घेतला. अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव फलटणमधील ‘जिद्द’ या निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

फलटण तालुक्यातील अनेक शैक्षणिक, सामाजिक , सांस्कृतिक संस्थांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. फलटण तालुका दूध संघाचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. त्यांच्या मागे एक विवाहित मुलगा, सून, विवाहित मुली, असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शरद पवारांसह मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे. सुभाषराव शिंदे हे महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे मार्गदर्शक देखील होते.

खासदार शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली

फलटण तालुक्यातील आणि माणदेशातील माझे विश्वासू तसेच जवळचे सहकारी सुभाष शिंदे यांच्या निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे. राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांच्या धडाडीच्या कामाने एक वेगळी छाप त्यांनी पाडली होती. शिंदे कुटूंबीय व त्यांच्या अनुयायांप्रती माझ्या सहसंवेदना मी व्यक्त करतो. मला कायम त्यांची पोकळी पदोपदी जाणवत राहील. सुभाष शिंदे यांच्या आत्म्यास सद्गती प्राप्त होवो, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.