कराड प्रतिनिधी | थोर शास्त्रज्ञ लुईस पाश्चर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून पाटण तालुक्यातील जिल्हा
परिषद शाळा माजगाव येथे नुकतेच विज्ञान
जत्रा व रांगोळी प्रदर्शन या दोन उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
भविष्यकालीन शिक्षणाचा वेध घेत सध्याच्या संगणक युगातील वाढत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सक्षम विद्यार्थी तयार व्हावा व प्रत्येक मुलाच्या अंगी दडलेल्या सुप्त गुणांना संधी मिळावी या उद्देशाने शाळेत ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ‘विज्ञान जत्रा’ या सहशालेय उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शाळेत १ ली ते ७ वी चे वर्ग असून एकूण पट ९९ आहे. सदर उपक्रमात ३ री ते ५ वी च्या २९ तर ६ वी ते ७ वी च्या २८ अशा तब्बल ५७ विद्यार्थ्यांनी स्वताची कौशल्ये वापरून पाणी व आरोग्य, घनकचरा विल्हेवाट, चांद्रयान, दैनंदिन जीवनातील विज्ञानाचा वापर, शेंद्रीय शेती अशा विविध विषयावर वैज्ञानिक उपकरणे तयार करून स्पर्धेत सहभाग नोंदवला.
तसेच तब्बल ३२ विद्यार्थ्यांनी रांगोळी स्पर्धेतही सहभाग नोंदवला. व गटशिक्षणाधिकारी सौ. दीपा बोरकर यांच्या प्रेरणेतून केंद्रप्रमुख श्री. निवासराव निकम यांच्या मार्गदर्शनातून व मुख्याध्यापक श्री केसेकर यांच्या संकल्पनेतून तसेच शाळेतील शिक्षक सौ. जाधव, सौ. पवार व श्री. पवार यांच्या उत्कृष्ट नियोजनातून यशस्वी झालेल्या या उपक्रमाचे उद्घाटन गावच्या सरपंच रेखा जाधव, उपसरपंच श्री. गोरख चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. शिखरे यांच्या हस्ते झाले.
उपक्रमास शाळा व्यावास्थापन समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य, ग्रामपंचायत माजगाव चे सर्व सदस्य, तसेच विद्यार्थ्यांचे पालक व माता पालक तसेच विज्ञान प्रेमी युवक व युवतींनी भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
उपक्रमाचे परीक्षण बाह्य परीक्षाकामार्फत करण्यात करण्यात आले असून परीक्षक म्हणून केंद्र संचालक श्री. रमेश पोतदार, श्री. दादासो गायकवाड, शीतल
बाबर तसेच रयत शिक्षण संस्थेचे माजी सेवक श्री. रामचंद्र जाधव यांनी केले.