पाटण प्रतिनिधी । दुर्गम व डोंगरी पाटण तालुक्यात लहान वयात समृध्द दहा लेखिका तयार झाल्या असून त्यांच्या नवनव्या कल्पना प्रत्यक्ष कागदावर उतरवल्या आहेत. गृहपाठ करता-करता चिमुकल्या हातांनी पेन हाती घेत त्या पेनने गृहपाठच नव्हे तर वेगवेगळ्या गोष्टी कागदावर उतरवल्या. या गोष्टींचे पुढे जाऊन पुस्तक तयार झाले. ‘मुळगावच्या मुलांच्या गोष्टी’ या दहा शालेय विद्यार्थीनींनी लिहलेल्या पुस्तकाचे उत्पादन शुल्कमंत्री तथा पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन करण्यात आले.
पाटण तालुक्यातील मुळगावच्या प्राथमिक शाळेतील चिमुकल्या मुलींनी ही किमया घडवली आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २८ गोष्टींचेष्टीं ५२ पानी पुस्तक या दहा विद्यार्थीनींनी लिहिले आहे. श्रेया पाटणकर, प्रिती सुपुगडे, जान्हवी साळुंखे, मेघा देसाई, साक्षी देसाई, देवश्री कळके, अनुष्का भिसे, सानिका सुपुगडे, प्रज्ञा गायकवाड, प्रणाली भिसे असे या बाल लेखिकांची नावे आहेत. सुरुवातीला या बाल लेखिकांनी चित्राचे वर्णन करण्यास सुरूवात केली. त्यामधे शुध्दलेखन व मांडणी यावर भर देत चित्रावरून कल्पना करत त्याची वास्तवाशी जोड लिखाणात देण्याचा प्रयत्न केला. या विद्यार्थिनींनी केलेल्या या किमयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गतवर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणेचे माजी सहाय्यक शिक्षण संचालक नामदेव माळी व जेष्ठ इतिहास अभ्यासक सदानंद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोजक्या शिक्षकांची ‘चला लिहूया’ याविषयाची कार्यशाळा झाली होती. या कार्यशाळेत ‘सुंदर हस्ताक्षर, शुध्दलेखन’ यासह चित्रावरून व प्रसंगावरून विद्यार्थ्यांना स्वत:च्या कल्पनेतून गोष्टी लिहिता याव्यात, याबाबतचे मार्गदर्शन करण्यात आले होते.
अशा प्रकारे बाल लेखिकांनी केला लेखनाचा श्रीगणेशा
गटशिक्षणाधिकारी दिपा बोरकर यांच्या प्रेरणेतून तालुक्यातील निवडक शाळेतील शिक्षकांनी हा उपक्रम हाती घेतला. त्यामधील मुळगाव ही एक शाळा. या शाळेतील चिमुकल्यांना साहित्य क्षेत्राचा लवलेश नसतानाही शाळेतील दहा विद्यार्थीनींनी गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली प्रबळ ईच्छाशक्तीच्या जोरावर बाल साहित्यिक म्हणून लेखनाचा ‘श्री गणेशा’ केला. शिक्षिका योगिता बनसोडे यांनीही तब्बल बारा महिने त्यांच्याकडून जुन्या-नव्या पाठ्यपुस्तकातील चित्रावरून गोष्टी लिहून घेतल्या. दिवसेंदिवस लिखाणातील चुका कमी करीत नवनवीन कल्पनांना वाव दिला. परिच्छेद तयार करणे, विरामचिन्हांचा योग्य वापर करणे आदी बारकावे तपासल्याने शुध्दलेखनासह दर्जेदार लिखाण कागदावर उतरले आणि अठ्ठावीस गोष्टींचे ५२ पानी ‘मुळगावच्या मुलांच्या गोष्टी’ हे पुस्तक तयार झाले.