शरद पवारांची साथ सोडत सत्यजितसिंह पाटणकर भाजपात; मुंबईत कार्यकर्त्यांसह हाती घेतलं कमळ

0
3274
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. अनेक वर्षांपासून निष्ठावंत म्हणून असलेले पाटण तालुक्यातील सत्यजितसिंह पाटणकर यांनी आज सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भाजपचे कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबईत पार पडलेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमास भाजप कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले, कराड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांच्यासह पाटणकर गटातील कार्यकर्त्याची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आज वर्धापनदिन आहे. मात्र, या वर्धापनदिनी भाजपकडून शरद पवारांना धक्का देण्यात आला आहे. 26 मे 2025 रोजी पाटणमध्ये एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत सत्यजित सिंह पाटणकर यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आज सत्यजितसिंह पाटणकर भाजपामध्ये प्रवेश करणार आहे. सत्यजितसिंह पाटणकरांच्या भाजपा प्रवेशामुळे पाटणमध्ये हा नवा राजकीय भूकंप मानला जात आहे.

सत्यजित पाटणकर भाजपमध्ये जाणार असल्याची काही महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. भाजपमध्ये जाण्याच्या अनुषंगाने नुकतीच पाटणकरांची कार्यकर्त्यासमवेत बैठक पार पडली. सत्यजीत पाटणकर हे माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे पुत्र आहेत. तर सत्यजित पाटणकर हे शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांचे प्रतिस्पर्धी मानले जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये सत्यजित पाटणकरांचा प्रभाव दिसू शकतो.