सत्यजीतसिंह पाटणकरांसह काँग्रेसचा ‘हा’ जेष्ठ नेता हाती घेणार ‘कमळ’; उद्या मुंबईत करणार भाजपात प्रवेश

0
78
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांची बैठक भाजपमध्ये प्रवेशाबाबत चर्चा केली होती. या बैठकीत चर्चा पार पडल्यानंतर आता सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजप प्रवेशाबाबत निर्णय घेतला असून त्यांच्यासह पाटण विधानसभा मतदार संघातील काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील बापू हे देखील कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश करणार आहे. सत्यजितसिंह शरद पवारांचे जवळचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे चिरंजीव आहेत. तर हिंदुराव पाटील हे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय आहेत. उद्या मंगळवार दि. १० रोजी मुंबईत युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर व जेष्ठ नेते हिंदुराव पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचं ‘कमळ’ हातात घेणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे निष्ठावंत पाईक म्हणून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांची ओळख आहे. थोरल्या पवारांनी नेहमीच पाटणकरांना ताकद दिली. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांना काम करण्याची संधी मिळाली. पण अलीकडच्या काही वर्षात ‘वाड्यावर’चा कारभार बंद होवून तो ‘कारखान्या’वरून होऊ लागला आहे. त्यामुळे पाटणकर समर्थकांच्यात अस्वस्थता वाढली. कार्यकर्त्यांची हीच अस्वस्थता लक्षात घेऊन पाटण पंचायत समितीचे माजी सभापती सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजप प्रवेशाचा मार्ग निवडला.

साथ सोडणे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का

सत्यजीत पाटणकर गटाकडे सध्या पाटण पंचायत समितीची एकहाती सत्ता आहे. सत्यजीत पाटणकर सातारा जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात आहेत. नव्याने स्थापन केलेल्या शुगेरकेन फॅक्टरीच्या माध्यमातून सत्यजीत मतदारसंघातील शेतकऱ्यांना देखील आकर्षित करण्याचा प्रयत्न करतायेत. त्यामुळे त्यांनी शरद पवारांची साथ सोडणे हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जातो आहे.

‘या’ कारणामुळे घेतला असावा भाजप प्रवेशाचा निर्णय…

पाटण विधानसभा मतदारसंघात विद्यमान पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांचे वर्चस्व आहे. सत्यजितसिंह यांना सलग तीनवेळा शंभूराज यांच्या विरोधात पराभव पत्कारावा लागला आहे. 2024 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीट न मिळाल्याने सत्यजितसिंह यांना अपक्ष निवडणूक लढले. मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागले. तेव्हापासून ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत होत्या. तिकीट न मिळाल्याच्या कारणामुळेच भाजप प्रवेशाबाबतचा निर्बी पाटणकरांनी घेतला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

पाटणमधून तिन्ही पक्ष संपवण्याचा भाजपचा डाव…

सत्यजीत पाटणकर शरद पवारांना सोडून आपल्याकडे येतील, असे अजित पवार यांना वाटत होते. पण, तसे घडले नाही. सत्यजीत पाटणकर यांच्यासोबत पाटण तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एकमेव नेते हिंदुराव पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे पाटणमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हे तीनही पक्ष संपण्याची चिन्हे आहेत.