कराड प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. गेली दोन पिढ्यांपासून एकनिष्ठ असलेल्या पाटणकरांनी प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची साथ सोडत कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, सत्यजित पाटणकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असा सर्वांचा होरा होता. पण, तो अंदाज चुकवत सत्यजित पाटणकर यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजेंनी महत्वाची भूमिका बजावली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेही उपस्थित होते. यावेळी भाजप प्रवेशाबाबत देखील चर्चा झाली तसेच आज पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची देखील बैठक होत असून त्यात प्रवेशाबाबत चर्चा केली जाणार आहे
सत्यजित पाटणकर (Satyajeet Patankar) यांचे वडिल विक्रमसिंह पाटणकर हे शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. पाटणकर हे १९८३ पासून २००४ चा अपवाद वगळता २००९ पर्यंत विधानसभेत होते. त्यानंतर २०१४ पासून त्यांचे चिरंजीव सत्यजित पाटणकर हे राजकीय वारसा चालवत आहेत. पण, त्यांनी तीव वेळा विधानसभा निवडणूक लढवली, मात्र, त्यात त्यांना यश आले नाही.
विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांना उमेदवारी अपेक्षा होती. मात्र, पवारांनी तो मतदारसंघ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडला आणि त्याच ठिकाणी पाटणकर यांच्या मनातील पवारांविषयच्या प्रतिमेला तडा गेल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले. पाटणकर यांचा साखर कारखाना आहे, तसेच कार्यकर्त्यांना सत्तेचे बळ मिळणे गरजचे होते, तेव्हापासून पाटणकर यांच्या राजकीय भूमिकेकडे लक्ष लागले होते.
वास्तविक शरद पवार यांची साथ सोडून सत्यजीत पाटणकर हे आपल्याकडे येतील, असे अजित पवार यांना वाटत होते. मात्र, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावत पाटणकर यांना भाजपच्या कळपात घेऊन जाण्यात मोठी खेळी खेळल्याचे मानले जात आहे. सत्यजीत पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाच्या निर्णयामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हे तीनही पक्ष पाटण मधून संपणार आहेत.
सत्यजीत पाटणकर शरद पवारांना सोडून आपल्याकडे येतील, असे अजित पवार यांना वाटत होते. पण, तसे घडले नाही. सत्यजीत पाटणकर यांच्यासोबत पाटण तालुक्यातील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एकमेव नेते हिंदुराव पाटील देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्यामुळे पाटणमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस हे तीनही पक्ष संपण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे पाटण विधानसभा मतदारसंघात आता भाजपविरुद्ध शिवसेना (एकनाथ शिंदे) अशी थेट लढत पहायला मिळणार आहे.
सत्यजीत पाटणकर यांच्या प्रवेशामुळे सातारा जिल्हा परिषदेचे समीकरण बदलणार आहे, या प्रवेशामुळे सातारा जिल्हा परिषदेत भाजपची एकहाती सत्ता येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतदेखील भाजपचे वर्चस्व वाढणार आहे. एकंदरित पाटणकर यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय हा सातारा जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता आहे. सत्यजीत पाटणकर आणि साताऱ्याचे पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे पाटण मतदारसंघातील पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाने शंभूराज देसाई यांच्या वर्चस्वाला खीळ बसण्याची शक्यता आहे.
कार्यकर्त्यांची आज बैठक
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटणकर गटाची उद्या (सोमवार) दुपारी श्रीराम मंदिर, पाटण येथे पाटण विधानसभा मतदारसंघातील आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक सुरू झाली असून आहे. या बैठकीस माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, सत्यजितसिंह पाटणकर, माजी सभापती राजाभाऊ शेलार, हिंदुराव पाटील, कोयना शिक्षण संस्थेचे संचालक याज्ञसेन पाटणकर, जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती राजेश पवार, पाटण अर्बन बँकेचे चेअरमन बाळासाहेब राजेमहाडिक, पाटण खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अॅड. अविनाश जानुगडे, दूध संघाचे अध्यक्ष सुभाषराव पवार, कोयना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सोपानराव चव्हाण आदी मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत.