सातारा प्रतिनिधी । सातारा तालुक्यातील पेट्री येथील राज कास हिल रिसोर्टवर सातारा तालुका पोलिसांच्या पथकाने शनिवारी अचानक छापा टाकला. यामध्ये सहा बारबाला व त्यांच्यासोबत नाचणारे १८ जण, हॉटेल मालकासह २१ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या या धडक कारवाईत ८३ हजारांची रोकड, मोबाईल हँडसेट, साउंड सिस्टिम, डिस्को लाइट असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलिस ठाण्यात सुरू होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, पेट्री येथील राज कास हिल रिसॉर्ट नावाच्या हॉटेलमधील एका हॉलमध्ये सहा बारबाला आणण्यात आल्या असून, त्या गिऱ्हाईकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाचत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक समीर शेख यांना मिळाली. यानुसार त्यांनी उपअधीक्षक किरणकुमार सूर्यवंशी, पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके यांना कारवाईच्या सूचना केल्या. त्यानुसार त्यांनी एक पथक तयार केले. पथकाला घेऊन त्यांनी शुक्रवारी रात्री राज रिसाॅर्टवर छापा टाकला.
त्यावेळी तेथे संगीताच्या तालावर सहा बारबाला बीभत्स अवस्थेत नाचत होत्या. त्यांच्यासमोर १८ जण बसले होते. यातील काहीजण बारबालांवर पैसे उधळत होते. पोलिसांनी तातडीने रिसाॅर्टचे दरवाजे बंद केले. मात्र, मागच्या दरवाजाने हाॅटेल मालक नंदू नलवडे (रा. नागठाणे, ता. सातारा) तसेच मॅनेजर, वेटर्स तेथून पळून गेले.
त्यानंतर पोलिसांनी १८ जणांना ताब्यात घेतले. या सर्वांनी संगनमत करून सहा बारबालांना बीभत्स कृत्य करण्यास प्रोत्साहन दिले. तसेच प्रिमायसेस परवान्याचे नूतनीकरण न करता रिसाॅर्टमध्ये विना नोकरनामा सहा महिलांना हाॅटेल मालकाने कामावर ठेवले. याप्रकरणी पोलिसांनी संशयितांवर वेगवेगळे गुन्हे दाखल केले.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी, हवालदार मालोजी चव्हाण, सचिन पिसाळ, किरण जगताप, शंकर पाचांगणे, नीलेश यादव आदींनी ही कारवाई केली.
हॉटेल मालकासह आणखी तिघे फरार
हॉटेलमध्ये डान्स पार्टी सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संबंधित हॉटेवर छापा टाकला. पोलिसांचा छापा पडताच हॉटेल मालकासह आणखी तिघे फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.