सातारा प्रतिनिधी । सातारा पोलिसांच्यावतीने सोमवारी अवैध गुटखा वाहतूक प्रकारणी एक मोठी कारवाई करण्यात आली. पुण्यातून साताऱ्यात कारमधून गुटख्याची तस्करी करणाऱ्या पुण्यातील दोघांना सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली. त्यांच्याकडून १ लाख २५ हजारांचा गुटखा आणि एक कार, असा सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करण्यात आला आहे.
रमेश साखरचंद शहा (वय ४५), अभिषेक कुमार मिश्रा (२२, दोघे रा. गुरुवार पेठ, पुणे), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, पुण्याहून सातार्यात एका कारमधून अवैध गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी एक पथक तयार करून सापळा लावला. सोमवारी पहाटेच्या सुमारास सदर बझार परिसरातील कूपर काॅलनीतून एक कार येत होती. ही कार पोलिसांनी अडवली. मात्र, न थांबताच चालक तेथून पसार होऊ लागला. पोलिसांनी अखेर पाठलाग करून कार थांबवली.
पोलिसांनी कारची तपासणी केली असता पोत्यामध्ये भरलेला गुटखा आढळून आला. वाहन व त्यातील १ लाख २५ हजारांचा गुटखा देखील पोलिसांनी जप्त केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश माने, पोलिस उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, संतोष घाडगे, मच्छिंद्रनाथ माने, सचिन रिटे, सुशांत कदम यांनी कारवाई केली.