मंत्री गोरेंच्या खंडणीच्या गुन्ह्यातील महिलेच्या अटकेनंतर उपमुख्यमंत्री शिंदेंच्या ‘सुभेदार’ला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

0
3175
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या खंडणीच्या मागणी प्रकरणी सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने काल शुक्रवारी पहाटे महिलेला अटक केली. संबंधित महिलेने अश्लील फोटोचे प्रकरण मिटवण्यासाठी गोरे यांच्याकडे तीन कोटी रुपये मागितले होते. त्यातील एक कोटीची रक्कम स्वीकारताना महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या महिलेमागे आखणी राजकीय पदाधिकारी असल्याचे समोर आले असून सातारा पोलिसांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार यांनाही अटक केली आहे. या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अनिल सुभेदार याला दहिवडी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. खंडणी प्रकरणात संबंधित महिलेसह अनिल सुभेदार याचा सहभाग असल्याचा आरोप असून दहिवडी येथील न्यायालयात अनिल सुभेदार याला पोलिसांनी हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालयाकडून त्यांना 25 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात अटकेत असलेला तुषार खरात हा संबंधित महिलेच्या अधिक संपर्कात असल्याचे आणि सुभेदार हे खरात व संबंधित महिलेच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक पुराव्यात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे कोठून आले? रोहित पवारांचा सवाल

दरम्यान, शुक्रवारी संबंधित महिलेला अटक करण्यात आल्यानंतर दिवसभरात पवार कुटुंबीयानी देखील मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात आक्रमक पावित्रा घेतला. संबंधित महिलेला देण्यासाठी एक कोटी रुपये मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे कोठून आले?, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तर खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणाच्या कारवाईबाबत शंका उपस्थित करत पोलिस प्रशासनाची पोलिसगिरी सुरू आहे का?, असा सवाल केला.

महिलेच्या पिशवीत एक कोटी रुपये कोणी टाकले आहे का? सुप्रिया सुळे

खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील त्या महिलेच्या पिशवीत एक कोटी रुपये कोणी टाकले आहे का? असा सवाल करत कारवाईवर शंका उपस्थित केली आहे. या अश्लील फोटो प्रकरणावरून मंत्री गोरे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी विधिमंडळात लावून धरली होती. मात्र, हे प्रकरण 2019 मध्ये मंत्री गोरे यांची न्यायालयाने मुक्तता केली आहे.