सातारा प्रतिनिधी । तब्बल एक वर्षांपासून गुंगारा देत फिरत असलेल्या मोक्कातील एका आरोपीस जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकास यश आले आहे. पिन्या उर्फ सुनील माणिकराव शिरतोडे (रा. पाडळी सातारारोड, ता. कोरेगाव) असे आरोपीचे नाव असून त्याला फलटण तालुक्यातून अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना जिल्ह्यातील मोक्काच्या गुन्ह्यात फरार आरोपींना पकडण्याची सूचना केली होती. त्यानुसार देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार केले होते.
दरम्यान, फरार आरोपींचा शोध सुरू असतानाच पोलिस निरीक्षक देवकर यांना शाहूपुरी पोलिस ठाण्याकडून मोक्काची कारवाई झालेला पिन्या शिरतोडे हा बरड, ता. फलटण परिसरात वावरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी सहायक निरीक्षक भोरे यांना त्याला ताब्यात घेण्याची सूचना केली. तपास पथकाने पिन्याची माहिती काढली व त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.