सातारा प्रतिनिधी । हवामान खात्याने येत्या 10 किंवा 11 जून रोजी मुंबईत पाऊस सुरू होईल तर 15 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला आहे. यंदा 96 ते 106 टक्के पाऊस होईल असा अंदाज आहे. पावसाळ्यात नुकसान होण्याची शक्यता जास्त असते. अशा काळात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन समितीकडून कार्यवाही केली जाते. सध्या पावसाळा सुरू झाला असून, जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापन समिती सज्ज झाले आहे. याचाच एक भाग म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयात काल दि. १ जूनपासूनच आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात आला आहे. तर पावसाळ्यातील पूरस्थिती हाताळण्यासाठी कराड आणि पाटण तालुक्यात नदीमध्ये बोटिंग चाचणी घेण्यात आली आहे.
दरवर्षी साधारणपणे दि. ७ ते १० जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर पाऊस पडण्यास सुरुवात होते. सुरुवातीचे २ ते अडीच महिने जिल्ह्याच्या पश्चिम भागात धुवाधार पाऊस पडतो. महाबळेश्वर, कोयना, कास, बामणोली, तापोळा, कांदाटी खोऱ्यात पर्जन्यमान अधिक राहते. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत होते. अनेक दिवस लोकांना घराबाहेर पडता येत नाही. तसेच रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका असतो, झाडे पडतात. अशा काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनतो.
खास करून अतिवृष्टीच्या काळात कोयना, कृष्णा नदीला महापूर येतो. काहीवेळा पाणी पात्राबाहेर जाते. यासाठीही जिल्हा प्रशासनाला दक्ष राहावे लागते. याकरिता जिल्हा प्रशासनाकडून एक महिना अगोदरच आढावा घेऊन तयारी केली जाते. सध्या पावसाळ्याला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
आपत्ती कक्ष २४ तास राहणार सुरु
जिल्हाधिकारी कार्यालयात दरवर्षी एक जूनपासून आपत्कालीन कक्ष सुरू करण्यात येतो. हा कक्ष २४ तास सुरू असतो. आताही हा कक्ष सुरू करण्यात आलेला आहे. तसेच विविध विभागांचेही कक्ष सुरू राहणार आहेत. तर कराड आणि पाटण तालुक्यात पूरस्थिती निर्माण होते. नदीकाठच्या रहिवाशांना धोका निर्माण होतो. या काळात उपाययोजना राबविण्यात येतात. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन विभागाच्या वतीने कराड येथील प्रीतिसंगम परिसरात बोटिंग चाचणी घेण्यात आली. यावेळी बोटी, लाइफ जॅकेट, दोरखंड, स्ट्रेचर आदींचा वापर करण्यात आला. यावेळी कराड पालिकेचे पथक तसेच १५० होमगार्ड्स, नदी काठावरील गावांतील तरुण, तलाठी, मंडलाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, तहसीलदार विजय पवार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी देवीदास ताम्हाणे, होमगार्डचे केंद्रनायक तुषार वरांडे आदी उपस्थित होते.
पाटणमध्ये कोयना नदीत बोटिंगची प्रशिक्षण
अतिवृष्टी, पूरपरिस्थिती आदी नैसर्गिक आपत्ती काळात सामना करण्यासाठी पाटण तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीकडून स्थानिकांना प्रशिक्षण देण्यासाठी एक बोट आणण्यात आली. यावेळी कोयना नदीत पथकातील जवानांनी नागरिकांना बोट कशा प्रकारे चालवायची?, नदीत पूर आल्यास स्वतःचा बचाव कशाप्रकारे करायचा? पोहता येत नसेल तर कोण कोणत्या साधनांचा बचावासाठी वापर करायचा आदी विषयी आपत्ती व्यवस्थापन विभागातील पथकातील प्रशिक्षकांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. पाटण तालुक्यातही पूरस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाकडून नुकतीच बोटिंग चाचणी घेण्यात आली. मुळगाव येथे कोयना नदीत हे प्रात्यक्षिक पार पडले. यावेळी तहसीलदार अनंत गुरव तसेच इतर अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आपत्ती व्यवस्थापन विभागास सूचना
गट आठवड्यात जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, प्रांताधिकारी यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत त्यांनी महत्वाच्या सुच देखील केल्या. मान्सून कालावधीत मनुष्य व पशुहानी होणार नाही याची सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. सर्व गटारे स्वच्छ करावीत. नेहमी पूर येणाऱ्या भागात अधिकची काळजी घ्यावी. स्वच्छता मोहिम राबविताना सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिल्या.
कोयना धरणावर देखील पूर नियंत्रण कक्ष
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात कोयना धरण असून या धरणाची पाणी साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. या धरणाचे तांत्रिक वर्ष एक जूनपासून सुरू झाले. तर धरणावर शनिवारपासूनच पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास धरणात १७.५८ टीएमसी पाणीसाठा होता. पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी कोयनेच्या सहा दरवाजांतूनही विसर्ग करावा लागतो. त्यामुळे कोयना नदीला पूर येतो. तसेच कऱ्हाड येथेही पूरस्थिती बनते.
‘या’ अधिकाऱ्यांवर स्थलांतरणाची जबाबदारी
सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मी महिन्यात १५ दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सून पूर्व आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्यावर पूर आणि दरड प्रवण गावांतील नागरिकांना त्यांच्या पशुधनासह तत्काळ हलविण्याची व्यवस्था करावी. नागरिकांच्या निवारा, अन्न, पाणी, वीज आदी सोयीसुविधांबरोबर जनावरांसाठी पाण्याची व चाऱ्यांची व्यवस्था करावी. नागरिकांचे स्थलांतर करण्याची जबाबदारी ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व कोतवाल यांच्याकडे द्यावी, अशी स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी डूडी यांनी केली होती.