कराड प्रतिनिधी । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला कराड ते सातारा अशी नेण्यात येणारी यशवंत ज्योत कराडच्या प्रीतीसंगमावर यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष अनिल देसाई, जेष्ठ संचालक विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते प्रज्वलित करण्यात आली. यावेळी बँकेचे संचालक मकरंद पाटील, प्रभाकर घार्गे, राजेंद्र राजापुरे, सत्यजित पाटणकर, दत्तानाना ढमाळ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांच्यासह संचालक मंडळाच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी विधानपरिषदेचे माजी सभापती तथा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जेष्ठ संचालक रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आम्ही सर्व संचालक स्वताला भाग्यवान समजतो कि या सहकाराच्या ज्योतीची स्थापना दिवंगत यशवंतराव चव्हाण साहेबानी केली. आज त्यांच्या समाधीस्थळी उभे राहत त्यांच्या विचाराची यशवंत ज्योत आम्ही आज बँकेत नेत आहोत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक हि देशात नंबर एकची बँक आहे. नाबार्डनेही आपल्याला नावाजलेलं आहे.
यावेळी मकरंद पाटील म्हणाले की, आजच्या दिवशी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृतमहोत्सवाचा शुभारंभ झाला आहे. आजचा दिवस हा सातारा जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. जिल्ह्यातील अनेक मान्यवरांनी बँकेस जी काही दिशा दिली. आणि बँकेच्या स्थापनेचा पाया रचला. याचे फलित म्हणजे आता पर्यंत ७५ वर्षात या बॅँकेने जिल्ह्यातील कष्टकरी शेतकऱ्याला न्याय देण्याचा त्याला आर्थिक सहाय्य करत स्वतःचा पायावर उभं करण्याचा पर्यंत केला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अमृत महोत्सव समारंभास कराडच्या प्रीतिसंगमावरून ‘यशवंत ज्योती’ने प्रारंभ pic.twitter.com/JMJcil9PDk
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) August 14, 2023
कराड येथून मुख्य बाजारपेठेतून दत्त चौकात हि ज्योत आणण्यात आली. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ही ज्योत घेऊन राष्ट्रीय महामार्गावरून बँकेच्या शंभर कर्मचाऱ्यांच्या वतीने साताऱ्याच्या दिशेने प्रस्थान करण्यात आले. साताऱ्यात राजवाडा येथील प्रतापसिंह महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पोवई येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आबासाहेब वीर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून सकाळी आठ वाजता ही ज्योत बँकेच्या मुख्यालयाच्या आवारात आणली जाणार आहे. या ज्योतीचे स्वागत रामराजे नाईक-निंबाळकर करणार आहेत.