तालुकास्तरीय कार्यशाळांच्या माध्यमातून सेंद्रीय शेतीचे क्षेत्र वाढवावे – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन या योनजेच्या तालुकास्तरावर कार्यशाळा घेऊन यामध्ये सरपंच, गटामध्ये सहभागी होणारे शेतकरी, कृषि सहायक, कृषि पदविधारक यांना आमंत्रित करुन जास्तीत जास्त क्षेत्र सेंद्रीय शेतीमध्ये रुपांतरीत करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेद्र डुडी यांनी केल्या.

डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन आढावा सभा जिल्हाधिकारी श्री. डुडी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे, आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर, प्रकल्प उपसंचालक फिरोज शेख, बोरगाव कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ भूषण यादगीरवार यांच्यासह कृषि विभागातील अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी डूडी यांनी तालुकानिहाय दिलेल्या लक्षांकाप्रमाणे 15 नोव्हेंबरपर्यंत गट व शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी. सेंद्रीय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना बाजार पेठेविषयी माहिती द्यावी. एम.आर.जी.एस योजनेद्वारे शेतकऱ्यांनी नाडेप व गांडुळ युनिट अभिसरणाद्वारे उभारण्याबाबतच्याही सूचना केल्या.

कृषि विभागामार्फत 50 हे. प्रमाणे 140 गट स्थापन करण्याचे लक्षांक देण्यात आले आहे. तसेच कृषि विज्ञान केंद्र, बोरेगाव व कालवडे मार्फत 20 गट स्थापन करण्याचे लक्षांक देण्यात आले आहे. तसेच शेतकरी प्रशिक्षण, शेतकऱ्यांच्या शेतावर निविष्ठा निर्मिती, शेतकरी उत्पादक कंपनी निर्मितीसाठी तरतुद, कंपनी व गट स्तरावर जैविक निविष्ठा केंद्र स्थापन करणे या विषयी सविस्तर माहिती श्री. बंडगर यांनी बैठकीत दिली.