सातारा प्रतिनिधी | राज्यात लुटमारीच्या घटना वाढल्या असून, आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे -बेंगलोर महामार्गावर संभाजीनगर शिवराज पेट्रोल पंपाच्या परिसरात लुटमार करणाऱ्या तिघांना सातारा शहर पोलिसांनी पेट्रोलिंगच्या दरम्यान अटक केली आहे.
जीवन महादेव गायकवाड (वय २० रा. प्रतापसिंहनगर) याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दिनांक २४ फेब्रुवारी रोजी सातारा शहरातील शिवराज पेट्रोल पंप येथे एक जण पुणे येथून बेळगावला जाण्यासाठी खासगी वाहनाने उतरला होता. सातारा येथून दुसऱ्या वाहनाने पुढील प्रवासासाठी चौकशी करण्याकरता तो जात असताना दुचाकीवरील तीन युवकांनी सातारा एसटी स्टँड जवळ सोडतो असे सांगत त्याला निर्जन ठिकाणी नेले आणि त्याच्याकडील मोबाईल व दहा हजार रुपये काढून घेतले. या गुन्ह्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात झाली होती. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, सुधीर मोरे, हवालदार निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पंकज मोहिते, दीपक ताटे, विठ्ठल सुरवसे, सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी ही कारवाई केली.
मोबाईल व रोख रक्कम हस्तगत
पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे रात्रगस्तीच्या दरम्यान दोन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता तिसऱ्या इसमाला अटक करण्यात आली. या लुटमारीतील मोबाईल व रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली.